इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील काही उद्योजक मंडळी अत्यंत दानशूर असून त्यांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावला आहे. देशभरात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात, त्यापैकीच गुजरातमध्ये ढोलकीया परिवाराचे उदाहरण दिले जाते. या परिवाराने आपल्या गावाच्या विकासासाठी प्रचंड संपत्ती दान केली आहे, इतकेच नव्हे तर आपले गाव १०० सौर ऊर्जेने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी स्वखर्चाने तलाव खोदून दिला आहे, इतकेच नव्हे तर एक हेलिकॉप्टर देखील भेट दिले आहे त्यामुळेच ढोलकीया कुटुंबाची सर्वत्र चर्चा होत आहे.
साधारणपणे ढोबळमानाने असे सांगितले जाते की, आपल्या भारत देशात सुमारे १० टक्के अति गरीब नागरिक राहतात, तर सुमारे ८०टक्के मध्यमवर्गीय असून १० टक्के अमीरांकडे प्रचंड संपत्ती आहे, या संपत्तीपैकी निम्मी संपत्ती जरी वाटली तर देशभर गरीब राहणार नाही, असे म्हटले जाते. गेल्या ७५ वर्षात देश विकासाकडे वाटचाल करीत असताना काही प्रमाणात निश्चितच प्रगती झालेली दिसून येते यामध्ये केंद्र आणि शासनाच्या सहभाग असला तरी काही प्रमाणात उद्योजकांची भूमिका ही मोलाची मानली जाते. काही उद्योजक मंडळी निश्चितपणे विकास कामात मदत करतात. त्यामध्ये ढोलकिया या उद्योजक सावजी ढोलकिया व गोविंद ढोलकिया यांनी गावाच्या विकासात संपत्ती दान करून श्रीमंतांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
पद्मश्री मिळाल्यानंतर हरी कृष्ण डायमंड कंपनीचे मालक सावजी ढोलकिया यांना त्यांच्या कुटुंबीयांनी हेलिकॉप्टर भेट दिले होते. मात्र आता सावजी ढोलकिया यांनी त्यांचे हे सूरत शहराला हेलिकॉप्टर दान केले आहे. या हेलिकॉप्टरचा वापर वैद्यकीय आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी होणार आहे. सावजी ढोलकिया हे हेलीकॉप्टर मनापासून सामाजिक कारणांसाठी भेट देण्याचा निर्णय घेतला.
गुजरात सरकारच्या जलसंचय कार्यक्रमांतर्गत सावजी ढोलकिया यांनी त्यांच्या दुधाळा गावातील तलावाचे स्वखर्चाने खोलीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी तलावाच्या उद्घाटनासाठी आले होते. विशेष म्हणजे, ढोलकिया यांनी आपले जीवन जलसंवर्धन आणि पाण्याची कमतरता असलेल्या सौराष्ट्र प्रदेशात तलाव खोदण्यासाठी समर्पित केले आहे. त्यांनी अमरेली जिल्ह्यातील लाठी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावाभोवती ७५ हून अधिक तलाव बांधले आहेत.
सावजी ढोलकिया यांच्या हिरे कंपनीच्या लॉयल्टी कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू म्हणून ५०० कार, ४७० ज्वेलरी सेट आणि २८० दोन बेड रूमचे फ्लॅट दिले आहेत. सावजी ढोलकिया यांच्या कंपनीत एकूण ५५०० कर्मचारी आहेत आणि कंपनीची वार्षिक उलाढाल ६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
उद्योजक गोविंद ढोलकिया श्री राम कृष्ण एक्सपोर्ट या हिऱ्यांच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मूळ गाव दुधालामध्ये ८५० घरांना सोलर पॅनल रुफटॉप गिफ्ट केले आहेत. यामुळे दुधाला हे कोणत्याही सरकारी सबसिडीशिवाय १०० टक्के सौर उर्जेवर चालणारा देशातील पहिले गाव बनले आहे. या प्रकल्पातून सर्व घरांमध्ये १ ते ३ किलोवॉट पर्यंत वीज तयार होणार आहे. गावच्या सरपंच सीता सतिया यांनी सांगितले की, यामुळे गावाच्या विकासाला वेग येणार आहे. ग्रामस्थांना त्यांची कामे इतर कामे करण्यासाठी मदत मिळणार आहे, तसेच वीजेवरील पैसेही वाचणार आहेत.
सध्या गोविंद ढोलकिया यांची तब्येत साथ देत नाही. गेल्या वर्षी त्यांचे यकृत प्रत्यारोपण झाले होते. यामुळे त्यांना नवजीवन मिळाले. समाजाला काहीतरी देणे परत द्यायचे होते. म्हणून त्यांनी आपल्याला काय करता येईल, याच्या आयडिया मागविल्या होत्या. आता गावकऱ्यांना सोलर पॅनलद्वारे वीज मिळाल्याने पुढील अनेक वर्षे फायदा होत राहिल. या उपक्रमामुळे अन्य उद्योजकांना देखील अशा कामाची प्रेरणा मिळेल, असे गोविंद ढोलकिया म्हणाले. तसेच गोविंद ढोलकिया यांच्या श्री राम कृष्ण नॉलेज फाऊंडेशनने हा प्रकल्प सोलार पॅनेल निर्माता आणि प्लांट डेव्हलपर गोल्डी सोलर यांच्या भागीदारीत केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण २७६ किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.
Industrialist Govind Dholakia Village Donation
Gujrat Donor Padmashree