इंदूर – विवाह समारंभ म्हटला की, त्यामध्ये कचरा हा होतोच असतो. कारण लग्नसोहळ्याला या सोहळ्याला आलेल्या नागरिकांचा नाश्ता, जेवण, चहापान याकरिता प्लास्टिक, थर्माकोल आणि पेपर पासून तयार केलेल्या डिशेस आणि ग्लासचा वापर करण्यात येतो. सहाजिकच विविध प्रकारचा कचरा वाढून प्रदूषण होते. सहाजिकच शहरांमधील कचरा वाढून त्याची समस्या निर्माण होते. परंतु इंदूर शहरात मात्र कचरा होऊ नये, म्हणून केवळ प्रशासनाकडून नव्हे तर नागरी कडून करून देखील काळजी घेण्यात येते. देशांमध्ये सलग पाच वेळा सर्वात स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या इंदूर शहरात आता एक विवाह समारंभ पार पडणार असून त्यामध्ये झिरो वेस्टेज वेडिंग्स म्हणजे शून्य कचरा विवाह मोहीम राबविण्यात येणार आहे.
देशातील सर्वात स्वच्छ असलेल्या शहरातील लोकही लग्न समारंभात स्वच्छतेबाबत नवनवीन प्रयोग करत असतात. इंदूरमध्ये झिरो वेस्ट वेडिंग्स होत आहेत, ज्यामध्ये प्लास्टिक, पेपर आणि थर्माकोल या डिस्पोजेबल वस्तूंचा वापर केला जात नाही. दि. ३ डिसेंबर रोजी सफाई कामगार महिला सुनीता खत्री यांनी मुलगा सिद्धार्थ याचा विवाह शून्य कचरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विवाह शून्य कचरा मोहीमेत करण्यासाठी महापालिकेची टीमही सहकार्य करत आहे.
साधारणपणे लग्नसमारंभात प्लॅस्टिक आणि कागदाचे ग्लास आणि डोनट्सचा वापर केला जातो, मात्र या शून्य कचरा लग्नात अशा वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. सुमारे ५०० पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महापालीकेने आपल्या भांडी बँकेतून ३०० पाहुण्यांसाठी डिस्पोजेबलच्या जागी स्टीलची भांडी, ग्लास, प्लेट्स, चमचे उपलब्ध करून दिले आहेत. कारण महापालिकेकडून वाढदिवस आणि इतर कार्यक्रमांसाठी घरोघरी भांडी पुरविली जातात. लग्नसमारंभात भांडी बँकेची भांडी वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विवाह सोहळ्यात डिस्पोजेबल ऐवजी भांडी वापरण्याचा निर्णय घेतला.
समारंभात महापालीकेशी संलग्न असलेल्या स्वाहा एजन्सीच्या मोबाईल कंपोस्टिंग प्लांटद्वारे कार्यक्रमस्थळीच ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. यापुर्वी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशाच प्रकारे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे कंपोस्टिंग करण्यात आले. लग्नाला येणार्या पाहुण्यांना एक किलो कंपोस्ट खत देखील भेट म्हणून दिले जाईल जेणेकरुन ते त्यांच्या घरातील रोपांसाठी वापरू शकतील.