भोपाळ (मध्य प्रदेश) – भारतातील कोणतेही गाव असो की शहर स्वयंपूर्ण, स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असावे, अशी केवळ सरकारचीच नवे तर नागरिकांची अशी देखील अपेक्षा असते. परंतु त्यासाठी केवळ सरकारने प्रयत्न करून उपयोग होत नाही, तर तेथील नागरिकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक असते. तरच ते गाव स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर दिसू शकते. भारतातील अशा काही गाव आणि शहर यांनी देशासमोर आदर्श निर्माण केला आहे.
मध्य प्रदेशची औद्योगिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या इंदूर शहरात दररोज १२०० टन कचरा निर्माण होतो, मात्र त्यानंतरही शहरात अस्वच्छता दिसून येत नाही. कारण येथील नागरिक स्वच्छता प्रिय असून स्थानिक प्रशासन तथा इंदूर महापालिकेकडून नियमितपणे कचरा व्यवस्थापन केले जाते. त्यामुळेच या शहराने सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान मिळवला आहे. इंदूरला स्वच्छ शहरा व्यतिरिक्त विविध श्रेणींमध्ये १९ पुरस्कार मिळाले आहेत.
नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री भूपेंद्र सिंह यांना नुकताच नवी दिल्ली राष्ट्रपती राम नाथ कोविद यांच्या हस्ते ‘इंदूर स्वच्छ शहर पुरस्कार’ मिळाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबद्दल इंदूरचे अभिनंदन केले आहे. इंदूर शहराला सन २०१७ पासून सातत्याने स्वच्छता अभियानांतर्गत सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित केले जात आहे.
यावेळी इंदूरला सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये सर्वोत्कृष्ट शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमांतर्गत केवळ स्वच्छतेचे कामच होत नाही, तर या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच इंदूर हे धूळमुक्त शहर म्हणून ओळखले जाते. येथे नदी नाल्यांचे घाण पाणी पुन्हा वापरण्या योग्य बनविण्याचे कामही केले जाते.
इंदूर शहरात १२०० टन कचरा निर्माण होतो, त्यापैकी ७०० टन ओला कचरा आहे. खत आणि बायो मिथेनायझेशन प्लांटचा वापर करून शहरातील या कचरा व्यवस्थापनातूनही महसूल मिळतो. ३४३ कोटींच्या निधीतून शहरातील १३७ किमी नदी-नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. शहरात ४५० टन सुका कचरा निर्माण होतो, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या इंदूर महापालिकेला दोन कोटी रुपये देतात.