नवी दिल्ली – एखाद्याला सरकारने बक्षीस जाहीर करावे आणि ते मिळविण्यासाठी त्याला वर्षानुवर्ष सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणे ही बाब भारतात अत्यंत सामान्य आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगावर खूश होऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी खेदारू याला एक बक्षीस जाहीर केले. पण चाळीस वर्षे प्रतीक्षा करूनही त्याला बक्षीस मिळाले नाही, शेवटी त्याचा अलीकडेच मृत्यू झाला.
ही घटना 1980-81 ची आहे. बिहारमधील गोडियापट्टीत खेदारू हे नारायणपूर घाट रोड येथे एक दुकान चालवायचे. त्यांच्या दुकानाच्या मागच्या भागात दहा किलो सोने सापडले. त्यांनी प्रशासनाला कळविले पण दिल्लीत जाऊन इंदिरा गांधींना आपल्या हाताने सोपविण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. अर्थात त्याने तशी अटच घातली. त्याची अट प्रशासनाने मान्य केली. त्याच्या प्रामाणिकपणावर खूश होऊन इंदिरा गांधी यांनी खेदारूला 20 एकर जमीन बक्षीस दिली. खेदारू अनेक वर्षे सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत राहिले, मात्र त्यांना जमीन मिळाली नाही. अखेर त्यांनी प्रयत्न बंद केले व चार दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार खेदारू यांना मदनपूर व नौरंगिया येथे 20 एकर जमीनीचा पट्टा मिळाला होता. त्यावेळी संबंधित जमीनीवर अतिक्रमण होते. जमिनीचा पट्ट घेऊन खेदारू जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्याधिकाऱ्यापर्यंत चक्कर मारत राहिले. पहिले अतिक्रमण आणि नंतर वनजमीन सांगून खेदारूला परत पाठविण्यात आले. खेदारू यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे इंदिरा गांधींसोबतचे छायाचित्र चांगलेच गाजत आहे. पण आता हे छायाचित्र ठेवून ठेवून खराब झाले आहे.