नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशकात उद्योजक,व्यापारी आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे अधिफक व्यापक जाळे विणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्याच एक भाग म्हणून इंडिगो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नाशकातील विविध हॉटेल्सनां भेटी देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला, अशी माहिती आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ आणि ललित बूब यांनी दिली.
इंडिगोकडून 15 मार्चपासूनच नाशिकहून हैदराबाद, अहमदाबाद,दिल्ली आणि गोवा या चार शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू झाले असून त्याचे बुकिंग 10 फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे,असे सांगण्यात येते. याआधी 26 मार्चपासून इंडिगोची विमानसेवा सुरू होईल असे सांगण्यात आले होते.
दरम्यान नाशिकला भेट देणाऱ्या इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकात हवाई वाहतूक व्यवस्थापन संचालक सुरिंदर नारली, हवाई वाहतूक व्यवस्थापन सहाय्यक व्यवस्थापक अंकुश भटनागर, विमानसेवा सुरक्षा प्रमुख कॅप्टन अखिल,विमानसेवा ऑपरेशन सपोर्ट व्यवस्थापाक सुनीलकुमार महादेव, संचालक विकास मेहता,एचएएलचे विमानतळ संचालक आर.सी.दोडवे, एचएएलचे नितीन सिंग यांचा समावेश होता.आयमाच्या हवाई वाहतूक कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल हेही त्यांच्या समवेत होते.
क्रु मेंबर,पायलट आणि प्रवाशांच्या निवासासाठीची व्यवस्था म्हणून हॉटेल्स निश्चित करण्यासाठी तसेच आवश्यक त्या सोयीसुविधांचीही या पथकाने पाहणी केली. तसेच नाशिकला नाईट हॉल्टिंग करता येईल का यादृष्टीनेही त्यांनी पाहणी करून संबंधित यंत्रणांशी चर्चा केल्याची माहिती आहे. नाशिकला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे जाळे विणले जावे यासाठी आयमाने आणि विशेषतः आयमाच्या हवाई वाहतूक समितीचे चेअरमन मनिष रावल यांच्या साततच्या पाठपुराव्यामुळेच इंडिगोची टीम नाशकात आली. रावल पूर्णवेळ या टीमसोबत होते आणि त्यांनी या टीमला आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून दिली.
Indigo Airlines Nashik Air Service Booking