नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील विमानसेवा देणारी आघाडीची कंपनी इंडिगोने प्रवाशाला अतिशय वाईट वागणूक दिल्याची बाब समोर आली आहे. दिव्यांग मुलाला चक्क विमान प्रवास करण्यापासून रोखण्यात आले. याबाबीची गंभीर दखल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची ते स्वतःच चौकशी करणार आहेत.
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, इंडिगो एअरलाइन्सच्या घटनेची मी स्वतः चौकशी करणार आहे. ज्यात एका वेगळ्या दिव्यांग मुलाला त्याच्या पालकांसह रांची विमानतळावर विमानात चढण्यापासून रोखले गेले. अशा वर्तनाबद्दल शून्य सहनशीलता धोरण असून चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अशा प्रकारच्या वागणुकीबाबत शून्य सहनशीलता आहे. कोणत्याही माणसाने यातून जाऊ नये! मी स्वत: या प्रकरणाची चौकशी करत आहे, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.”
इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचार्यांनी एका वेगळ्या दिव्यांग मुलाला रांची विमानतळावर त्याच्या पालकांसह विमानात चढण्यापासून रोखल्याचा आरोप एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी घोषणा केली की मुलाला उड्डाण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. तो इतर प्रवाशांसाठी धोका आहे. प्रवासासाठी पात्र होण्यापूर्वी त्याला ‘सामान्य’ व्हावे लागेल.”
या घटनेचे स्पष्टीकरण जारी करताना, एअरलाइनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, एक विशेष दिव्यांग बालक 7 मे रोजी त्याच्या कुटुंबासह फ्लाइटमध्ये चढू शकला नाही. कारण तो घाबरलेल्या अवस्थेत होता. ग्राउंड स्टाफने शेवटच्या क्षणापर्यंत त्याची शांत होण्याची वाट पाहिली पण काही उपयोग झाला नाही.”
कंपनीने म्हटले आहे की, “एअरलाइनने कुटुंबाला हॉटेलमध्ये राहण्याची सोय करून दिली. कुटुंबाने आज सकाळी त्यांच्या गंतव्यस्थानाकडे उड्डाण केले. इंडिगोला एक सर्वसमावेशक संस्था असल्याचा अभिमान आहे, मग ती कर्मचारी असो किंवा ग्राहकांसाठी. दर महिन्याला इंडिगोसह 75 हजाराहून अधिक दिव्यांग प्रवासी विमान प्रवास करतात.
https://twitter.com/JM_Scindia/status/1523505174672674816?s=20&t=hMSnscyWnxF9m6TeIpLM2g