मुंबई – दिव्यांग व्यक्तींचे दुःख किंवा अडचणी या काही वेळा सर्वसामान्यांना आकलन होण्यापलीकडे असतात. कारण या व्यक्तींना एकतर घरातच व्हिलचेअरवर बसून राहावे लागते किंवा घराबाहेर पडले तर फिरण्यासाठी कुणाचा तरी आधार घेऊन एखाद्या वाहनात बसावे लागते. त्यानंतरच इतरत्र प्रवास करणे शक्य होते. मात्र आता दिव्यांग व्यक्ती व्हीलचेअरवर बसून घरात सर्वत्र फिरू शकतील, इतकेच नव्हे तर हीच व्हीलचेअर जेव्हा रस्त्यावर येईल. तेव्हा त्याचे रूपांतर स्वयंचलित वाहनांमध्ये होईल त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना कुठेही प्रवास करणे शक्य होणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासने देशातील पहिले स्वदेशी मोटरवर चालणारे व्हीलचेअर वाहन विकसित केले आहे. ही निओबोल्ट नावाची व्हीलचेअर ताशी 25 किलोमीटर वेगाने धावू शकते. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर 28 किलोमीटर पर्यंत चालेल. सदर व्हीलचेअर रस्त्यावर येताच मोटारसायकलसारखे बनते. विशेष म्हणजे ती सपाट रस्त्यावर तसेच खडबडीत रस्त्यावरही वापरली जाऊ शकते. यात लिथियम-आयन बॅटरी वापरली जाते.
आयआयटी मद्रासच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या प्राध्यापक आणि पुनर्वसन संशोधन आणि उपकरण विकासासाठी टीटीके सेंटरच्या प्रमुख सुजाता श्रीनिवासन यांनी निओमोशन स्टार्टअपच्या सहकार्याने, निओबोल्ट नावाचे हे पहिले स्वदेशी मोटर चालणारे व्हीलचेअर वाहन विकसित केले आहे. अपंगांच्या सुविधा आणि समस्या लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. हे डिझाइन करताना, संशोधन संघाने दिव्यांगआणि पॅरालीसीसने ग्रस्त लोक आणि त्यासाठी कार्यरत संस्था आणि रुग्णालयांतील तज्ज्ञांचीही मदत घेतली. त्यांचे अनुभव लक्षात घेऊन उत्पादनामध्ये काही बदल करण्यात आले आहेत तसेच डिझाइनमध्ये सुधारणाही करण्यात आल्या आहेत.
प्रा. सुजाता श्रीनिवासन म्हणाल्या की, अनेकदा आपण दिव्यांगजनांना व्हीलचेअरवर पाहतो. पण त्याचे आयुष्य मर्यादित राहते. त्यांना घराच्या चार भिंतीबाहेर सामान्य लोकांच्या प्रमाणे फिरण्याचे स्वातंत्र्य मिळावे हा या मागचा हेतू होता. त्यानुसार निओबोल्टची रचना करण्यात आली. ती खुर्ची घराच्या आत व्हीलचेअर आणि बाहेर मोटरसायकल बनते. विशेषतः दिव्यांग लोकांद्वारे ते ऑपरेट करणे खूप सोपे आहे. तसेच शॉक वगैरे टाळण्यासाठी सुविधा आहे.
या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वस्तिक सौरव दास यांच्या मते, बाजारात पर्सनल व्हीलचेअरची किंमत 39,900 रुपये आहे. तर निओबोल्ट मोटरयुक्त अॅडव्हास-व्हीलचेअरची 55,000 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना फक्त एक हजार रुपये भरून ऑर्डर बुक करता येते. भारतात दरवर्षी तीन लाख व्हीलचेअर विकल्या जातात. यापैकी 2.5 लाख परदेशातून आयात केले जातात. मात्र आता या वाहनांमुळे दिव्यांगांची अधिक सुलभ सुविधा होणार असून या विशेष लोकांना सामान्य लोकांप्रमाणे रस्त्यावर येण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.