इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – विजेचे बील आले की आज बघू उद्या बघू करत काही दिवस निघून जातात. मग अचानक एक दिवस वीज पुरवठा खंडीत होतो त्यादिवशी जाग येते. पण आता असे होणार नाही. आता अचानक बत्ती गुल होणार नाही यासाठी राज्य सरकारने स्मार्ट फंडा आणला आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऊर्जा मंत्री देखील आहेत. त्यांनी नवीन वर्षात महाराष्ट्रातील महावितरणच्या वीज ग्राहकांना नवी भेट देण्याची योजना आखली आहे. त्यानुसार आता महावितरणच्या दोन कोटी ४१ लाख ग्राहकांच्या घरात प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार आहे. पारंपरिक मीटर काढून हे नवे मीटर लागल्यानंतर वीज वापराचे चित्र महाराष्ट्रात पूर्णपणे बदलणार आहे. प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे आणि किती पैसे उरले आहेत, हेसुद्धा माहिती असल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. घरबसल्या मोबाइलवरून ऑनलाइन पैसे भरण्याचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाइलवर संदेश पाठविला जाईल. सध्याच्या पद्धतीत वीजग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठविले जाते. एखाद्या ग्राहकाने नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहक मोबाइल दूरध्वनीप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. वीज ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे हे प्रीपेड स्मार्ट मीटर असणार आहे.
मध्यरात्री पैसे संपले तरीही…
एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले, तर अचानक रात्री वीजपुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.
Now suddenly the light will not light! ‘Smart’ Fund of State Govt