इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मुकेश अंबानी यांनी पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपविण्यासाठी भाकरी फिरवली खरी, पण त्याचे परिणाम फारसे काही चांगले झालेले दिसत नाहीत. आकाश, ईशा आणि अनंत यांच्यावर जबाबदारी सोपविण्याचा निर्णय मुकेश अंबानी यांनी घेतला असला तरीही अनंत अंबानी या एकाच नावावरून वाद निर्माण झाल्याची माहिती आहे.
राजकारणात पुढच्या पिढीपकडे जबाबदारी सोपविण्याच्या प्रक्रियेला भाकरी फिरविण्याची उपमा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी दिली होती. त्यानंतर भाकरी फिरवणे याचा वापर अनेक ठिकाणी होऊ लागला. ज्या दिवशी मुकेश अंबानी यांनी पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मुकेश अंबानी यांनी भाकरी फिरवली असेच बोलले जाऊ लागले. त्यानुसार रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आकाश, ईशा आणि अनंत यांच्या संचालक मंडळातील समावेशाला मान्यताही देण्यात आली. मात्र रिलायन्सच्या दोन सल्लागार कंपन्यांनी अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
इंटरनॅशनल प्रॉक्सी सल्लागार फर्म इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डर सर्व्हिसेस इंक आणि मुंबईतील इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायजरी सर्व्हिसेस या दोन कंपन्यांनी अनंत अंबानी यांना संचालक मंडळात घेण्यास विरोध केला आहे. अनंत यांच्या वयावरून त्यांनी हा विरोध केला असल्याचे समजते. दुसरीकडे प्रॉक्सी फर्म ग्लास लुईस या कंपनीने अनंत यांच्या नियुक्तीचे समर्थन केले आहे. या फर्मच्या संचालकाने अनुभवाच्या आधारावर अनंत अंबानी यांच्या नियुक्तीला विरोध करणे योग्य नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. २६ ऑक्टोंबरपर्यंत अनंत यांच्या नियुक्तीच्या संदर्भात शेअरधारकांना मतदान करायचे आहे.
ईशा, आकाशच्या नियुक्तीचे समर्थन
ज्या दोन कंपन्यांनी अनंत यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे, त्यांनी ईशा आणि आकाश अंबानी यांच्या नियुक्तीचे मात्र समर्थन केले आहे. अनंत यांनी वयाच्या २८ व्या वर्षी झालेली नियुक्ती मतदानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बसत नाही, असे या कंपन्यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे मात्र स्वतः मुकेश अंबानी अडचणीत आले आहेत.
Controversy over the appointment of Anant Ambani? Big developments in Reliance