इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – एकतर कुठलीही व्यक्ती आयुष्यभर पोटासाठी संघर्ष करत असते. या संघर्षात त्याची स्वप्न अर्धवट राहून जातात. पण पिंपरी-चिंचवडचा एक पोलीस उपनिरीक्षक करोडपती झाल्यानंतर त्याच्या अडचणी वाढल्या आहे. आता त्याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी थेट निलंबनाचीच कारवाई केल्यामुळे त्याच्या या आनंदावर विरजण पडले आहे. त्याला विभागीय चौकशीत त्याचे म्हणणे मांडता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड येथील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ या गेमद्वारे दीड कोटी रुपये जिंकले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. मात्र काहीच वेळात त्यांच्याविरोधात राज्य सरकारकडे तक्रार करण्यात आली आणि आता झेंडेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकाराची भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांनी गृहमंत्र्याकडे तक्रार केली होती.
ऑनलाइन जुगारापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासनाकडून उपक्रम राबविले जात असताना फौजदार सोमनाथ झेंडे हे कर्तव्यावर जुगार खेळले. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. यातून लहान मुलांना ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे, असे अमोल थोरात यांचे म्हणणे होते. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली होती. तपासांती त्यांच्यावर कारवाई करायची का नाही ते ठरवलं जाईल असे देखील त्यांनी म्हटले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
औटघटकेचा आनंद
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम इलेव्हन च्या ऑनलाईन जुगारामध्ये अव्वल क्रमांक आल्याने तब्बल दीड कोटींची बक्षीस मिळाले. यामुळे झेंडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण त्यांचे निलंबन झाल्यामुळे हा आनंद औटघटकेचा ठरला. या घटनेमुळे पुन्हा एकदा ऑनलाईन जुगाराचा विषय चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रीटीची ईडी चौकशी करत असल्यामुळे हा विषय चर्चेत होताच. आता पोलीस अधिका-यांमुळे या विषयाची चर्चा वाढली आहे.
This major action was taken on PSI Somnath Zende who won 1.5 crores through the game Dream11….