इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – पाकिस्तान क्रिकेट संघ पराभूत झाला. त्यांना त्याची कारणेही माहिती आहेत. पण आता आपल्या देशात परत गेल्यानंतर आपले काय हाल होणार आहेत, याची त्यांना चांगली कल्पना आहे. सध्याची पाकिस्तानची टीम वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास घेऊन भारतात दाखल झाली खरी, पण त्यांना भारतीय संघाची गेल्या सात वर्ल्डकपची विजयी घोडदौड थांबवता आली नाही. त्यामुळे आता त्यांनी आयसीसीकडे चक्क भारतीय प्रेक्षकांचीच तक्रार केली आहे.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघासाठी वर्ल्डकप जिंकणे महत्त्वाचे असतेच, पण त्याही पेक्षा महत्त्वाचे असते ते सामना जिंकणे. अर्थात आजवर सात विश्चचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये पाकिस्तानला एकदाही भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी भारत-पाकिस्तान हा वर्ल्डकपमधील सामना प्रतिष्ठेचाच मानला जात असतो. अशात भारताने पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवली आहे. १४ ऑक्टोंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखभर चाहते उपस्थित होते. पाकिस्तानच्या चाहत्यांना व्हिसा न मिळाल्यामुळे भारतीय संघाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे प्रमाण जास्त होते. या सामन्यादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यातीलच एका व्हिडिओमध्ये मोहम्मद रिझवान आणि पाकिस्तानी खेळाडूंना पाहून चाहते ‘जय श्री राम’च्या घोषणा देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रार केली आहे. त्याशिवाय अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमच्या खेळाडूंना चांगली वागणूक मिळाली नाही, असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या सामन्याच्यावेळी पाकिस्तानच्या संघासोबत गैरवर्तन झाल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे. त्याबाबत त्यांनी आयसीसीकडे तक्रार केली आहे.
‘आमच्या पत्रकारांनाही रोखले’
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत आयसीसीकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये पीसीबीने म्हटले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात विलंब आणि विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तान चाहत्यांसाठी व्हिसा धोरण नसल्याबद्दल आयसीसीकडे आणखी निषेध नोंदवला आहे. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाला लक्ष्य करण्यात आलेल्या अनुचित वर्तनाबद्दल पीसीबीने तक्रारही दाखल केली आहे.
Pakistan complain to ICC after defeat