नवी दिल्ली – शेजारच्या चीनशी तणाव वाढलेला असताना केंद्र सरकारकडून लेह-लडाख सीमेपर्यंत रेल्वे आणि रस्ता बांधकामाला प्राधान्य देण्यात येत आहे. या अंतर्गत आशियाचा सर्वात लांब आणि उंच ठिकाणावर खोदण्यात आलेल्या जोजिला बोगद्याच्या समांतर नवा रेल्वे आणि रस्ता बोगद्याच्या (जोजिला फेज-२) बांधकामाचा प्रस्ताव आहे.
आपत्कालीन परिस्थितीत रस्ता वाहतूक बंद करून फक्त लष्करी जवानांसाठी रेल्वे चालविण्याचा
जोजिला बोगदा फेज-२ च्या बांधकामाचा उद्देश आहे. याद्वारे सीमेवर लष्करी वाहने, रसद, रणगाडे आदी वेगाने पोहोचविले जाऊ शकतात. रेल्वे रूळावर रेल्वे आणि रस्त्यावर वाहने चालणारा हा देशातील पहिलाच बोगदा ठरणार आहे.
लेह-लडाख सीमेवर कनेक्टिव्हिटीसाठी बोगद्यामध्ये रस्त्यासह रेल्वे रूळाच्या पर्यायावर काम करण्याचा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग संरचना आणि विकास महामंडळ लिमिटेडतर्फे (एनएचआयडीसीएल) जोजिला फेज-२ च्या कामाचे रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरधर अरमाने यांच्यासमोर प्रस्तुतिकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. पहिला फक्त रेल्वे रूळ तयार करणे, दुसरा रेल्वे आणि रस्ता असे दोन्ही निर्माण करणे.
श्रीनगर-लेहदरम्यान रूळ तयार करण्याचे कोणतेही नियोजन नाही असे रेल्वे विभागाने बैठकीत सांगितले. हिमाचल प्रदेशमधील मनाली-लेह-विलासपूरमार्गे रेल्वे रूळ तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. या मार्गावर रेल्वे ४० हून अधिक रेल्वे बोगदे बनविले जाणार आहेत. त्यावर मोठा खर्च होणार आहे. जम्मू-श्रीनगर-कारगिल-लेह परियोजना सुरू करण्यासाठी एनएचआयडीसीएलच्या वरिष्ठ अधिकार्यांनी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करावी असे निर्देश गिरधर यांनी दिले आहेत. रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर वरील परियोजनेचे काम सुरू केले जाणार आहे.