इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्याला प्रसिद्धी, फेम, लोकप्रियता मिळाली की एका कॉमन नजरेतून सेलिब्रिटींकडे बघण्याची सवय असते. पण, काही सेलिब्रिटी वेगळ्या असतात. फेम प्राप्त करण्यापूर्वीचा त्यांचा संघर्ष समाजासाठी आदर्श ठरावा असा असतो. भारतातील पहिली ट्रान्सजेंडर ब्युटी क्वीन नाज जोशी हिची संघर्षगाथाही तशीच आहे.
नाज जोशी… एकेकाळी रस्त्यावर भीक मागण्याची वेळ तिच्यावर आली होती. तिनं पोटासाठी सेक्स वर्कर म्हणूनही काम केलं. वयाच्या दहाव्या वर्षी घरातून हाकलून दिल्यानंतर संघर्षाचा डोंगर तिच्यापुढे उभा झाला. नाजने हा डोंगर पोखरून यशाला गवसणी घातली. आणि गेल्यावर्षी तिने आंतरराष्ट्रीय ब्युटी क्वीनचा खिताब जिंकला. स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आणि ज्यांनी नाकारलं होतं त्यांनाही हे अस्तित्व मान्य करण्यास भाग पाडलं. पण येथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने जो संघर्ष केला, त्याचे मोल कुठलीही प्रसिद्धी किंवा पैसा चुकवू शकत नाही.
दिल्लीतील एका श्रीमंत कुटुंबात नाजचा जन्म झाला. तिच्या भवती वैभव नांदत होतं. नाजने मुलगा म्हणून जन्म घेतला होता. पण तिला मुलींसारखं राहायला आवडायचं. तिचं वागणं-बोलणं बघून नातेवाईक, शेजारी सारेच तिला चिडवायचे. कुटुंबातल्या लोकांना ते आवडायचं नाही. पण त्यांनी लोकांना समजावण्यापेक्षा आपल्याच अपत्याचा तिरस्कार करायला सुरुवात केली. दहा वर्षांची असताना कुटुंबाने तिला घरातून बाहेर काढले.
मामाच्याच मुलाने…
नाज मुंबईत आली आणि तिच्या मामाच्या हॉटेलमध्ये काम करू लागली. एक दिवस मामाच्या मुलाने आणि त्याच्या काही मित्रांनी नाजवर अत्याचार केला. मामाने तिला रुग्णालयात भरती केलं. मामाला दुःख तर झालं, पण पुन्हा तो कधीच नाजकडे परतला नाही.
तृतीयपंथींची नजर
नाजवर मुंबईतील तृतीयपंथींची नजर पडली. त्यातील एकीने तिला आपल्या गुरूकडे नेले. त्या गुरूने नाजला कधी भीक मागायला लावली, कधी सेक्स वर्कर म्हणून पाठवले तर कधी डान्सबारमध्ये नाचायला लावले. पण नाजने जिद्द सोडली नव्हती. ती वेगवेगळ्या परीक्षा देत होती. नियमीत अभ्यास करत होती.
नशीब पालटलं
नाजने तिच्या चुलत बहिणीची मदत घेतली. बहिणीने तिला दिल्लीतील एनआयएफटीमध्ये प्रवेश मिळवून दिला. पैसा येऊ लागल्यावर नाजने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली आणि मुलगी झाली. त्यानंतर एका छायाचित्रकाराने मॉडेलिंगची अॉफ दिली. फॅशन शो आणि ब्युटी इंडस्ट्रीत तिचं पाऊल पडलं. त्यानंतर आजपर्यंत नाजने आठ सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आणि त्यातील सात स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आहेत.
India’s First Transgender Beauty Queen Naaz Joshi Success Story