छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर
विजय गोळेसर, नाशिक
नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील पहिले मंदिर आहे याची अनेकांना माहितीच नाही. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत उदो उदो करणार्या अनेक शिवाजी महाराजांच्या भक्तांना आणि शिवप्रेमींना देखील पंचवटीतील दिंडोरी रोडवर मखमलाबाद येथे पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची माहिती नाही. किंवा असली तरी त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले दिसत नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि दुसरे मंदिर नाशिकला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या १६० परिचितांना आम्ही पंचवटी बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर दाखविले. सर्वांनी या आगळावेगळ्या वैशिष्ट्याचे कौतुक केले. नाशिकचे हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर नावारूपाला यावे त्याचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कौतुक व्हावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी असणार्या सर्व नाशिकरांना वाटते. २१ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने नाशिकचे खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर आणि नाशिककरांनी मनावर घेतलं तर नाशिक मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा महाराष्ट्रभर जयघोष करता येईल.
बघा या मंदिराचा व्हिडिओ