नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-मध्य प्रदेशातल्या भोपाळ येथे आयोजित ‘जागतिक गुंतवणूकदार परिषद 2025’ च्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. महाशिवरात्रीच्या पवित्र पूर्वसंध्येला नव्या प्रकल्पासाठी अश्विनी वैष्णव यांनी एचएलबीएस परिवाराचे अभिनंदन केले. भारताची पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर(अर्धवाहक) चिप 2025 पर्यंत उत्पादनासाठी तयार होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात मध्य प्रदेशची वेगाने प्रगती
वैष्णव यांनी हा मैलाचा टप्पा गाठण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची स्तुती वैष्णव यांनी यावेळी केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादननिर्मितीला लक्षणीय गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
मध्य प्रदेशात 20,000 अभियंत्यासाठी प्रशिक्षण
मध्य प्रदेशात भविष्यातील कौशल्ये कार्यक्रमांतर्गत 20,000 अभियंत्यांच्या प्रशिक्षणाची घोषणा करून वैष्णव यांनी तंत्रज्ञानविषयक प्रगतीसाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली.
भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती क्षमतांना बळकटी
एकाच वेळी पाच निर्माणाधीन एककांसह भारताने सेमीकंडक्टर निर्मितीत लक्षणीय प्रगती केली आहे. पहिली ‘मेड इन इंडिया’ चिप 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. निर्मितीक्षम प्राविण्याला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 85,000 अभियंत्यांना प्रगत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादननिर्मितीत प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट दृष्टिकोन आणि नेतृत्व, याविषयी वैष्णव यांनी उपस्थितांना सांगितले. सरकारच्या अतूट वचनबद्धतेमुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यात यश आले असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव आणि मध्य प्रदेशातील जनतेचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
नवीन आयटी कॅम्पसची प्रमुख वैशिष्ट्ये
नव्याने उद्घाटन झालेला आयटी कॅम्पस (माहिती तंत्रज्ञान परिसर) 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा असून त्यामध्ये एकाच छताखाली आयटी हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. या सुविधेत डेस्कटॉप संगणक, ऑल-इन-वन वर्कस्टेशन्स, लॅपटॉप, टॅब्लेट आणि मॉनिटर्स देखील तयार केले जातील.
एचएलबीएसविषयी
एचएलबीएस ही एक तंत्रज्ञान कंपनी असून तिचे निर्मिती एकक भोपाळमध्ये आहे. तसेच भोपाळ आयटी पार्कमध्ये एक अत्याधुनिक निर्मिती व संशोधन आणि विकास सुविधा सुरू होत आहे. ही कंपनी देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील कंपन्यांना सेवा देण्यासाठी नवोन्मेष आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादने विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते. सर्वांसाठी, विशेषतः सामान्य जनतेसाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची परवडणारी क्षमता वाढविण्यासाठी किफायतशीर उपाय प्रदान करण्याचे एचएलबीएसचे उद्दिष्ट आहे.