इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या (जेएनपीए) न्हावा शेवा वितरण टर्मिनलवर स्वॅप करण्यायोग्य बॅटरी असलेल्या इलेक्ट्रिक हेवी ट्रकच्या भारतातील पहिल्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवला. आर. लक्ष्मणन, आयएएस, संयुक्त सचिव, एमओपीएसडब्ल्यू, आणि उन्मेष शरद वाघ, आयआरएस, अध्यक्ष, जेएनपीए आणि सीएमडी व्हीपीपीएल, यावेळी उपस्थित होते. यामुळे जेएनपीए हे भारतातील बंदरांमध्ये शाश्वत लॉजिस्टिक्सला चालना देणारे सर्वात मोठा ईव्ही ट्रकचा ताफा असलेले बंदर बनले आहे.
या कार्यक्रमादरम्यान, जेएनपीए आणि आयझॅक सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी (आयसीपीपी), अशोका विद्यापीठ, दिल्ली यांच्यात सामंजस्य करार झाला. या सामंजस्य करारामुळे बंदर अधिकाऱ्यांना विविध प्रकारचा माल आणि वस्तूंसाठी खर्च बेंचमार्किंग (मानक) आणि बंदर बेंचमार्किंग च्या दृष्टिकोनातून दर निश्चित करण्यासाठी एक संदर्भ चौकट तयार करणे शक्य होईल. यावेळी हेवी-ड्युटी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन देखील सुरू करण्यात आले. डिसेंबर 2026 पर्यंत आपल्या सुमारे 600 अवजड ट्रकच्या ताफ्यापैकी 90% वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये परिवर्तन करण्याचे जेएनपीएचे उद्दिष्ट आहे.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “आज, जेव्हा जेएनपीए आपल्या लॉजिस्टिक्स वाहनांच्या ताफ्याचे विद्युतीकरण करण्याचे निर्णायक पाऊल उचलत आहे, त्यावेळी ते बंदरांच्या सीमांपलीकडे एक संदेश देत आहे. हा संदेश देत आहे, की भारतातील बंदरे भविष्याचा स्वीकार करण्यासाठी तयार आहेत, शाश्वतता, कार्यक्षमता आणि नवोन्मेशाचा मापदंड निश्चित करणाऱ्या पद्धतींचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहेत. भारतातील बंदरे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प, एलएनजी आणि हायड्रोजन इंधन पायाभूत सुविधा आणि कार्गो हाताळणी उपकरणांचे विद्युतीकरण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की भारतीय सागरी क्षेत्र केवळ जागतिक घडामोडींशी जुळवून घेत नाही तर शाश्वतता आणि कार्यक्षमतेमध्ये नवीन मापदंड देखील प्रस्थापित करत आहे.”
सर्बानंद सोनोवाल पुढे म्हणाले, “अलिकडच्या काही महिन्यांमध्ये, जेएनपीए काही चांगल्या गोष्टींमुळे चर्चेत आहे, मग ते जागतिक बँकेच्या सीपीपीआय निर्देशांकात जागतिक स्तरावरील आघाडीच्या 25 बंदरांमध्ये स्थान मिळवणे असो, कंटेनर हाताळणीमध्ये विक्रम प्रस्थापित करणे असो, किंवा सेझ, डिजिटलायझेशन आणि हरित ऊर्जा यामधील महत्त्वाच्या प्रकल्पांना पुढे नेणे असो. आजच्या कार्यक्रमामुळे या यशाच्या शिरपेचात आणखी एक रत्न जडले आहे.”
“ईव्ही ट्रकच्या या नवीन ताफ्याचे लाँचिंग केवळ आपल्या लॉजिस्टिक ताफ्यात होणारी वाढ दर्शवत नाही तर बंदर कार्यान्वयनासाठी स्वच्छ, हरित आणि अधिक मजबूत भविष्याकडे एक आदर्श झेप दर्शवते, असे याप्रसंगी बोलताना, जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्हीपीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ म्हणाले. भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदराचे संरक्षक म्हणून, आर्थिक गतिमानता आणि पर्यावरणीय जबाबदारीचा संयोग साधणाऱ्या नवोन्मेषाचा स्वीकार करणे आपल्यावर बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले. ईव्ही ट्रकचा हा ताफा एका नवीन युगाचा अग्रदूत म्हणून काम करेल, जिथे शाश्वतता ही वाढीला पूरक नसून त्याचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
अत्याधुनिक ईव्ही ट्रकचा हा समावेश जेएनपीएच्या सागरी आणि लॉजिस्टिक्स परिसंस्थेत डीकार्बनायझेशन आणि ऊर्जा रुपांतरणाच्या प्रयत्नात आणखी एक निर्णायक पाऊल आहे. हा उपक्रम कार्गो वाहतूक कॉरिडॉरमध्ये कार्यक्षमता वाढवून आणि कार्बन फूटप्रिंट कमी करून जागतिक शाश्वततेच्या आवश्यकतांनुसार स्वतःला संरेखित करण्याचा प्राधिकरणाचा दृढनिश्चय प्रतिबिंबित करतो. आज, एकूण 50 ट्रकना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही संख्या वर्षाच्या अखेरीस वाढून 80 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
भारताच्या एकूण कंटेनर हाताळणी व्यापारापैकी जवळजवळ अर्धा व्यापार हाताळणी करणारे जेएनपीए हे राष्ट्रीय स्तरावर शाश्वत लॉजिस्टिक्ससाठी गती निश्चित करत असल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. जेएनपीए येथे ईव्ही ट्रकची तैनाती पीएम गती शक्ती आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण (एनएलपी) अंतर्गत भारताच्या व्यापक लॉजिस्टिक्स परिवर्तनाचा पुरावा आहे. बंदर कार्यान्वयनात ईव्ही ट्रक तैनात करून, जेएनपीए पुढील गोष्टी साध्य करेल :
राष्ट्रीय ऊर्जा संक्रमण उद्दिष्टांशी, विशेषतः 2070 पर्यंत भारताच्या निव्वळ-शून्य वचनबद्धतेशी संरेखन प्रदर्शित करणे.
राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन योजनेला (एनईएमएमपी) पाठबळ देत उच्च क्षमतेच्या लॉजिस्टिक मध्ये व्यावसायिक स्तरावर ई वाहनांचा स्वीकार प्रदर्शित करणे.
बंदर परिसंस्थेमध्ये उत्सर्जन, प्रदूषण आणि आवाज कमी करणे. कार्गो-हँडलिंग आणि शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या संपर्कासाठी ईव्हीचा स्वीकार करण्याच्या उद्देशाने इतर प्रमुख आणि साधारण बंदरांसाठी एक अनुसरण करण्याजोगे उदाहरण स्थापित करणे.
या समारंभातून इंडिया व्हिजन 2030 आणि हरित बंदर उपक्रमांतर्गत व्यक्त केलेल्या, सागरी क्षेत्रातील उत्सर्जन कमी करण्याच्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी जेएनपीएची दृढ वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. या उपक्रमांद्वारे, जेएनपीए पर्यावरणीय संरक्षण कार्यात्मक उत्कृष्टता यांचा संगम साथ होणाऱ्या पद्धतीचे प्रणेते म्हणून पुढाकार घेत राहते, आणि त्यामुळे देशाच्या बंदर आधारित विकासात अग्रगण्य म्हणून आपले स्थान अधिक बळकट करते.