नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्ये देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र सुरु झाले असून ही बाब नक्कीच नाशिक शहर जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. तसेच या ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे हक्क व कायद्याची माहिती होणार असून जागृकता वाढणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
वैधमापन शास्त्र विभाग, महानगर पालिका व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅफिक पार्क, मुंबई नाका या संस्थेच्या आवारात कायमस्वरुपी देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैध मापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक डॉ.रवींद्रकुमार सिंगल, वैद्यमापन शास्त्र विभाग नाशिकचे सहनियंत्रक नरेंद्र सिंह,उपनियंत्रक जयंत राजदेरकर, बाळासाहेब जाधव, नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी, संचालक सुरेश पटेल व ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष सुधीर काटकर उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ग्राहकांच्या तक्रारी नेहमी येत असतात. ग्राहक नेहमी फसविला जात असतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. जेणेकरुन ग्राहकांच्या फसवणूकीला आळा बसेल. ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहक जोडले जाऊन त्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीचे कार्यक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षाही श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
शिक्षित असणाऱ्या व्यक्तीबाबत फसवणुकीचे प्रकार कमी होतात. त्यामुळे शालेय जीवनापासून मुलांच्या पाठयपुस्तकात ट्राफिक आणि ग्राहक प्रबोधनाच्या माहितीचा समावेश करण्यात यावा. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय जीवनापासून वाहतूक नियमांचे व ग्राहक हक्क व कायद्याची माहिती होईल. तसेच असे ग्राहक प्रबोधन केंद्र राज्यातील प्रत्येक विभागात सुरु करावेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर ग्राहक प्रबोधन केंद्र उभारण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याचदा वाहन चालविणाऱ्यांना नियमांची पुरेशी माहिती नसते, त्यामुळे या ट्राफीक पार्कच्या माध्यमातून अवजड वाहनांचे वाहनचालक व इतर वाहने चालविणाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर राबविण्यात यावे. तसेच भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी. पेट्रोल डिझेलमध्ये सध्या बायो डिझेलच्या नावाखाली मोठी फसवणूक होते. त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनी यावेळी ग्राहक प्रबोधन केंद्रांची आवश्यकता व उपयुक्तता सांगितली. ते म्हणाले की , ग्राहक संरक्षण आणि वैधमापन शास्त्र विभागाचे काम माणसाच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत असते. वैधमापन शास्त्र विभागासाठी ग्राहक प्रबोधन केंद्र एक नवी सुरुवात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व नोंदी घेतल्या जात असल्याने या विभागाचे पारदर्शकपणे सुरु आहे. तसेच या विभागाचे अधुनिकीकरण होणे आवश्यक असल्याने मंत्री भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात नवीन लॅपटॉप व संगणक व इतर अनुषंगिक बाबींची पुर्तता करुन त्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तसेच या केंद्राचा उपयोग जास्तीत जास्त ग्राहकांनी करुन आपली फसवणूक टाळावी, असेही सिंगल यांनी यावेळी सांगितले. तसेच या केंद्राच्या माध्यमातून कायद्याविषयी माहिती ग्राहकापर्यंतर्यं पोहचविली जाणार असून ऑडीओ-व्हिडिओद्वारे, मनोरंजनाच्या माध्यमातुन सर्व माहिती दिली जाणार आहे.
कार्यक्रमापुर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संपूर्ण ग्राहक प्रबोधन केंद्राची पाहणी करुन माहिती घेतली.