मुंबई – देशात पहिल्यांदाच बन्नी जातीच्या म्हशीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने रेडकाला जन्म दिला असून या यशामुळे भारताने ओपीयू-आयव्हीएफ तंत्रज्ञानविषयक कार्यात पुढची पायरी गाठली आहे. गुजरातच्या सोमनाथ जिह्यात धनेज येथे असलेल्या विनय एल.वाला यांच्या मालकीच्या सुशीला कृषी केंद्रात करण्यात आलेल्या 6 आयव्हीएफ गर्भधारणांमधून हे पहिले आयव्हीएफ बन्नी रेडकू जन्माला आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 डिसेंबर 2020 रोजी गुजरातच्या कच्छ विभागाला दिलेल्या भेटीदरम्यान बन्नी म्हशींच्या जातीविषयी चर्चा केली होती. शास्त्रज्ञांनी विनय.एल.वाला यांच्या सुशीला कृषी केंद्रातील बन्नी जातीच्या 3 म्हशींवर प्रयोग सुरु केले. या तीन म्हशींच्या 29 बीजांवर प्रयोग केल्यानंतर त्यापैकी एका म्हशीच्या एकूण 20 बीजांना आयव्हीसी या साधनाद्वारे फलित करण्यात आले.
खरेतर, एका दात्या म्हशीच्या 20 बीजांपासून 11 भ्रुण निर्माण झाले. त्यातील 9 भ्रुण म्हशींच्या गर्भाशयात हस्तांतरित केल्यानंतर त्यातील 3 आयव्हीएफ गर्भधारणा यशस्वी झाल्या. दुसऱ्या दात्या म्हशीच्या बीजांपासून 5 भ्रुण तयार झाले त्यातून 2 गर्भधारणा यशस्वी झाल्या तर तिसऱ्या दात्या म्हशीकडून मिळालेल्या बिजांच्या भ्रुणापासून 1 गर्भधारणा यशस्वी झाली.
अशाप्रकारे, एकंदर 6 यशस्वी गर्भधारणा (40% गर्भधारणा दर) झाल्यानंतर त्यातील सर्वात पहिले आयव्हीएफ रेडकू आज जन्माला आले. हे भारतातील सर्वात पहिले आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्मलेले बन्नी जातीचे रेडकू आहे. सरकार तसेच शास्त्रज्ञ समुदाय अशा दोघांनीही म्हशींसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरण्यात मोठी क्षमता असल्याचे म्हटले असून देशातील पशुधनात वाढ करण्यासाठी कठोर मेहनत करत असल्याचे म्हटले आहे.