मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबईत १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक ऑलिम्पियाडमध्ये (आयओएए 2025) भारताने अत्यंत चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. विज्ञान शिक्षण आणि ऑलिम्पियाडमधील उत्कृष्टतेसह जागतिक नेतृत्व म्हणून भारताची स्थिती बळकट करत राष्ट्रीय संघाने चार सुवर्ण आणि एक रौप्य अशा पाच पदकांची घसघशीत कमाई केली आहे.
टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे (टीआयएफआर)राष्ट्रीय केंद्र असलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (एचबीसीएसई) च्या अधिपत्याखाली प्रशिक्षिण घेतलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाने अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे.
- सुवर्णपदक विजेते:
o आयुष मिश्रा
o अक्षय श्रीवास्तव
o बानीब्रत माजी
o पाणिनी - रौप्यपदक विजेते:
o सुमन गुप्ता
प्रथमच भारतात आयोजित करण्यात आलेल्या या ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच सहभागी होत असलेल्या १२ देशांसह, ६४ देशांमधून आलेल्या, उच्च माध्यमिक इयत्तांमध्ये शिकणाऱ्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आयओएएचा यावर्षीचा कार्यक्रम हा आतापर्यंतचा सर्वात भव्य कार्यक्रम ठरला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक सहयोग आणि युवकांच्या सहभागाच्या बाबतीत या कार्यक्रमाने महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.
होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती आणि केंद्रीय अणु उर्जा विभागाचे माजी सचिव डॉ. अनिल काकोडकर, भारतीय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान (आयआयएसटी)संस्थेचे संचालक प्रा.दीपंकर बॅनर्जी; केंद्रीय अणुउर्जा विभाग (डीएई) सचिव डॉ.अजित कुमार मोहंती यांच्या सन्माननीय उपस्थितीत मुंबई येथील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (एनएमएसीसी) आयओएए २०२५ चा समारोप सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी, सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, डॉ.काकोडकर यांनी त्यांच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या पाठपुराव्याचे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या भावनेचे कौतुक केले. निरीक्षणात्मक आणि गुरुत्वाकर्षणसंबंधी खगोलशास्त्रात भारताच्या वाढत्या गुंतवणुकीला अधोरेखित करून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्सुकता आणि कटिबद्धतेसह विज्ञानाच्या वेगवेगळ्या आघाड्यांवर संशोधन सुरु ठेवण्याचे आवाहन केले.
उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात प्रा.दीपंकर बॅनर्जी यांनी भारताच्या अंतराळ विज्ञानातील सर्वांगीण वाढीची चर्चा केली. सौर निरीक्षण आणि अंतराळाधारित संशोधन क्षेत्रात भारताच्या वाढत्या क्षमता अधोरेखित करत त्यांनी आदित्य-एल1 सारख्या भारताच्या आगामी मोहिमांवर अधिक भर दिला.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी स्पर्धेतील शैक्षणिक फेऱ्या झाल्या तसेच मार्गदर्शक आणि परीक्षकांच्या चर्चा झाल्या. भारताचा समृद्ध वारसा साजरा करणारा सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला आणि त्या माध्यमातून जागतिक युवकांना वैज्ञानिक आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठी अनोखा मंच प्रदान करण्यात आला.