मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) चा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आज म्हणजेच ४ मे २०२२ रोजी खुला झाला आहे. केंद्र सरकारने (जीओआय)ने एलआयसी आयपीओसाठी ९०२ रुपयांपासून ते ९४९ रुपये प्रति इक्विटी शेअर प्राइज बँड निश्चित केला आहे. यामध्ये पॉलिसीधारकांना ६० रुपयांची आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना ४५ रुपयांची सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पब्लिक इश्यू ९ मे २०२२ पर्यंत बोलीसाठी खुला राहणार आहे.
एलआयसी आयपीओच्या माध्यमातून केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रांमधील कंपन्यांमधील आपली ३.५ टक्के भागीदारी विक्री करणार आहे. याद्वारे सरकार २१ हजार कोटी रुपये उभारणार आहे. सरकारने फेब्रुवारीमध्ये एलआयसीमधील ५ टक्के भागीदारी विक्री करून ३१.६ कोटी रुपयांचे शेअर्स विक्री करण्याची योजना आखली होती. त्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी)कडे दस्ताऐवज जमा केले होते. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार असून, याने दीर्घकाळ गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी एलआयसीचा मेगा आयपीओ २ मे रोजी खुला होणार आहे. एलआयसीच्या आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदारांकडून सोमवारी चांगली प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.अँकर गुंतवणूकदारांकडून ५,६२० कोटी रुपयांची पूर्ण सदस्यता मिळाली आहे.
आयपीओबद्दल महत्त्वाची माहिती
– शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार एलआयसी आयपीओ ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) आज ८५ रुपये आहे. तो काल ६९ रुपये ते १६ रुपयांहून अधिक होता.
– आयपीओ ४ मे २०२२ रोजी खुला होणार असून, तो ९ मे २०२२ पर्यंत बोली लावण्यासाठी खुला राहील.
– केंद्र सरकारने एलआयसीचा आयपीओ मूल्य बँड ९०२ रुपये ते ९४९ रुपयांपर्यंत इक्विटी शेअर असा निश्चित केला आहे.
– सरकार या आयपीओतून २१,००८.४८ कोटी रुपये उभारणार आहे.
– एका लॉटमध्ये १५ शेअर्स असतील.
– एक बोलिदाता किमान एका लॉटसाठी अर्ज करू शकणार आहे. कमाल १४ लॉटची परवानगी देण्यात आली आहे.
– एलआयसी आयपीओसाठी अर्ज करण्यासाठी किमान गुंतवणूकदारांना १४,२३५ रुपये मोजावे लागणार आहेत. याची कमाल मर्यादा १,९९,२९० रुपये असेल.
– एलआयसीच्या शेअर्सच्या वाटपाची तारीख १२ मे २०२२ असेल.
– एलआयसीचे शेअर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध होणार आहेत. शेअर लिस्टिंगची संभाव्य तारीख १७ मे २०२२ असेल.