नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) वार्षिक सत्रात पाकिस्तानच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या भारताची महिला मुत्सद्यांची परंपरा प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनीही कायम ठेवली आहे. आपल्या संबोधनात त्यांनी महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना झणझणीत उत्तर दिले. पाकिस्तानच्या डोळ्यात अंजन घालताना त्यांनी जगासमोर पाकिस्तानची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानची पोलखोल करणार्या सर्व महिला मुत्सद्यांची माहिती आपण जाणून घेऊयात.
एनम गंभीर (२०१६)
भारताच्या मुत्सद्दी एनम गंभीर यांनी यूएनच्या महासभेत पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. शरीफ यांच्या भाषणानंतर एनम म्हणाल्या होत्या, की दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे पाकिस्तानचे जुने धोरण आहे. दहशतवादाला पोसणारा देश मानवाधिकाराबाबत बोलत आहे ही किती विचित्र गोष्ट आहे.
विदिशा मैत्रा (२०१९)
संयुक्त राष्ट्रात इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करून भारतावर अनेक आरोप लावले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता. पाकिस्तान नेहमीच संयुक्त राष्ट्राच्या मंचाचा गैरवापर करत आहे. इम्रान खान यांचे भाषण द्वेषपूर्ण आहे. संपूर्ण जगाला धोकादायक ठरणार्या दहशतवादाला पाकिस्तान पोसत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला होता.
स्नेहा दुबे (२०२१)
१) खुलेआम दहशतवादाला पाठिंबा देऊन त्यांना हत्यारे पुरविण्यासाठी पाकिस्तानची ओळख जागतिक स्तरावर झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने प्रतिबंधित केलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा अपमानजनक विक्रमही पाकिस्तानच्या नावावर आहे.
२) केवळ आणि केवळ शेजारच्या देशाला हानी पोहोचेल या आशेवर पाकिस्तान मागच्या दाराने दहशतवाद्यांना पोसत आहे. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानने आश्रय दिला होता. आजही पाकिस्तान शहीद म्हणून लादेनचा गौरव करत आहे.
३) पाकिस्तान दहशतवादाला बळी पडलेला देश आहे असे आम्ही ऐकत आलो आहोत. पण हे म्हणजे असे झाले की, स्वतः आग लावायची आणि स्वतःच अग्निशामक असल्याचे भासवायचे हेच पाकिस्तानचे उद्योग आहेत.
४) जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहणार आहे.
५) पाकिस्तानसारख्या देशाला बहुलवाद समझणे खूपच कठीण आहे. कारण ते आपल्याच देशात अल्पसंख्यकांना उच्च पदांपासून दूर ठेवतात.
कोण आहेत स्नेहा दुबे
– स्नेहा दुबे या २०१२ च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यात झाले आहे.
– पुण्यातील फर्ग्युजन कॉलेजमधून उच्च शिक्षण आणि दिल्लीतील जेएनयूमध्ये एमफिल झाले आहे.
– २०११ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयात झाली.
– २०१४ मध्ये त्यांना मॅड्रीड येथील भारतीय दूतावासात पाठविण्यात आले होते. सध्या संयुक्त राष्ट्रात त्या भारताच्या प्रथम सचिव आहेत.