नवी दिल्ली – देशात कोरोना प्रतिंबधक लसीकरण वेगाने सुरू असताना एका शहरात प्रत्येक व्यक्तीला लस दिल्याची घटना प्रथमच घडली आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये १०० टक्के लोकांनी लस घेतली आहे. शंभर टक्के लस घेतलेले भुवनेश्वर हे पहिलेच शहर ठरले आहे, अशी माहिती भुवनेश्वरच्या महापालिकेचे विभागीय उपायुक्त अंशुमन रथ यांनी दिली. शहरातील एक लाख स्थलांतरित मजुरांनाही लस देण्यात आली आहे.
अंशुमन रथ सांगतात, भुवनेश्वर महापालिकेने ३१ जुलैपर्यंत शहरातील सर्व नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले होते. यादरम्यान १८ वर्षांहून अधिक वयाच्या एकूण ९,०७,००० लोकांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये ३१ हजार आरोग्य कर्मचारी, ३३ हजार फ्रंटलाइन वर्कर, १८-४५ वर्षांचे ५,१७,००० लोक आणि ४५ वर्षांवरील ३,२०,००० लोकांचा समावेश आहे. एका अहवालानुसार, ३० जुलैपर्यंत कोविड लशीचे जवळपास १८,३५,००० डोस देण्यात आले आहेत.
प्रत्येक प्रभागात ५५ लसीकरण केंद्र स्थापित करण्यात आले होते. त्यामध्ये ३० प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि सार्वजनिक केंद्रांमध्ये स्थापित करण्यात आले होते. शहरात कमीत कमी १० ड्रइव्ह थ्रू लसीकरण सुविधा पुरविण्यात आली होती. त्याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी शाळांमध्ये १५ लसीकरण केंद्रे निर्माण तयार करण्यात आली.
महापालिकेच्या कर्मचार्यांनी कठोर मेहनत केल्याने तसेच स्थानिक लोकांनी सहकार्य केल्याने कोविड लसीकरण मोहिमेत भुवनेश्वर शंभर टक्के लसीकरण करून घेण्यात यशस्वी झाले. याबद्दल शहरातील सर्व लोकांचे मी आभार मानतो, असेही अंशुमन रथ म्हणाले.