जयपूर (राजस्थान) – देशभरात कोरोना विरुद्धच्या लढाईत सध्या लसीकरण मोहीम सुरू असून अनेक राज्यात या मोहिमेला वेग आला आहे. परंतु अद्यापही काही राज्यांमध्ये मात्र लसीकरणासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. राजस्थानमधील बीकानेर शहरातील प्रशासनाने मात्र यामध्ये आघाडी घेतली आहे. भारतात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात बीकानेर हे शहर प्रथम ठरले आहे. सोमवारपासून (१४ जून) लसीकरण अभियानाला प्रारंभ होत आहे.
कोविड साथीच्या आजारांवरील डोर-टू-डोर (घरोघरी ) लसीकरण करणारे बीकानेर हे देशातील पहिले शहर बनले आहे. सोमवारपासून ही लसीकरण मोहीम सुरू होईल. या अंतर्गत ४५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल. यापूर्वी शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरण केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत तीन दिवसांत ६५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच शहर कोविडमुक्त होईल, असे बीकानेर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारपासून लोकांच्या घरी ही लस पोहचवण्यासाठी मोबाइल ग्रुप देखील तयार करण्यात आले असून त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणीसाठी हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आले आहेत. या हेल्पलाइन नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येते. नोंदणीशिवाय लस दिली जाणार नाहीत. नोंदणीनंतर व्हॅन त्या भागात पोहोचेल आणि लोकांची तपासणी व लसीकरण करण्यात येईल. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीही उपस्थित असतील.
विशेष म्हणजे १० जणांच्या नोंदणीनंतरच ही लस व्हॅन लोकांच्या घरात जाईल. कारण लसच्या बॉक्समध्ये १० बॉटल्स आणि १० सुया लसीकरणासाठी तयार ठेवल्या जातात. जर दहापेक्षा कमी लोक असतील तर उर्वरित डोस खराब होण्याची शक्यता आहे. तसेच लस ४ तासांपेक्षा जास्त वेळ राहिल्यास लस खराब होत आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुमारे ६० टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या बीकानेरमध्ये १६ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३ लाख ६९ हजार लोकांना लस देण्यात आली आहे.