इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बहुतांश भारतीय पर्यटक या वर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटन करण्याऐवजी देशांतर्गत पर्यटनस्थळांना भेटी देऊ इच्छितात. या स्थळांमध्ये गोवा हे पहिल्या पसंतीचे, तर थंड हवेचे ठिकाण मनाली दुसऱ्या क्रमांकाचे पसंतीचे ठिकाण आहे, अशी माहिती OYO Travelpedia या संकेतस्थळाने दिली आहे. भारत, इंडोनेशिया आणि युरोपासह काही प्रमुख पर्यटन बाजारांमधील ग्राहकांच्या हेतू आणि अपेक्षांचा अभ्यास करण्यासाठी OYO कंपनीने वार्षिक ग्राहक सर्वेक्षण केले. यासाठी त्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये जवळपास तीन हजार ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
या सर्वेक्षणानुसार, ६१ टक्के भारतीय पर्यटकांनी स्थानिक आणि देशांतर्गत पर्यटनस्थळांवर फिरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर २०२२ या वर्षामध्ये २५ टक्के पर्यटकांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करण्याची व्यक्त केली आहे. प्रवासाचा उत्साह असणाऱ्या ८० टक्के उत्तर देणाऱ्या पर्यटकांनी कोरोना महामारीबद्दल चिंता व्यक्त केली. परंतु बूस्टर डोस आल्यामुळे प्रवास करण्यासाठी ते आश्वस्त झाले आहेत. सर्वेक्षणानुसार, एकतृतीयांश पर्यटकांनी सर्वात आवडते स्थळ म्हणून गोव्याला पसंती दिली आहे.
OYO Travelpedia च्या माहितीनुसार, गोव्यानंतर मनाली, दुबई, शिमला आणि केरळचा नंबर येतो. त्याशिवाय भारतीय पर्यटकांच्या यादीत मालदीव, पॅरिस, बाली आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. ३७ टक्के पर्यटकांनी आपल्या जीवनसाथिदारासोबत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर १६ टक्के पर्यटकांनी कुटुंबासोबत सुट्टी घालवण्याचा पर्याय निवडला. इतर १२ टक्के पर्यटकांनी एकट्यानेच प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंडोनेशियामधील बाली हे २०२२ साठी सर्वात आवडते पर्यटन स्थळ म्हणून निवडले गेले आहे. तर युरोपमधील बहुतांश पर्यटकांनी बाल्टिक समुद्रातील बॉर्नहोम या डेनिश बेटाला पसंती दिली. नेदरलँडमधील बहुतांश पर्यटकांना या वर्षी ऑस्ट्रियाचा प्रवास करायचा आहे.