कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय कला संग्रहालयात (एनजीए) ठेवण्यात आलेल्या भारताच्या १४ अमूल्य कलाकृती भारताला परत करण्यास ऑस्ट्रेलियाने मान्यता दिली आहे. यात काही पितळेच्या मूर्ती तसेच दगडी शिल्पे असून काही पेंटिंग्ज आणि छायाचित्रेही आहेत. या सर्व कलाकृतींची किंमत जवळपास ३० लाख डॉलर्स आहे. यातील काही कलाकृती या १२ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.
१९८९ ते २००९ या काळात या गोष्टी एनजीएमध्ये समाविष्ट करण्यात आल्या. अशा अँटिक वस्तूंची तस्करी करणारा डीलर सुभाष कपूर याच्याकडून या सगळ्या वस्तू हस्तगत करण्यात आल्याचे सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने म्हटले आहे.
या मौल्यवान वस्तू पुन्हा एकदा भारतात जाणार आहेत, याचे फार मोठे समाधान असल्याची भावना या नॅशनल गॅलरीचे संचालक निक मित्झेविक यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच या निर्णयामुळे आमच्या गॅलरीच्या इतिहासातील एका दुःस्वप्नाचा अंत होणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्त मनप्रीत वोरा यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाचे भारत सरकार स्वागत करत असून त्यांच्या या निर्णयाबद्दल आम्ही आभारी आहोत. यापूर्वीही २०१४ मध्ये संग्रहालयाने ५० लाख डॉलर्स एवढी किंमत असलेली भगवान शंकरांची मूर्ती भारताला परत केली होती. पितळेची ही मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिल्याची आठवण वोरा यांनी सांगितली. या मौल्यवान अँटिक वस्तूंची चोरी झाल्यानंतर त्या तस्करीच्या मार्गे ऑस्ट्रेलियाला पोहोचल्याचे संग्रहालयाचे म्हणणे आहे. दरम्यान, सुभाष कपूर अशाच तस्करीच्या प्रकरणात सध्या शिक्षा भोगत आहे.