इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे लग्न हा कायमच त्यांच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिलेला आहे. आता तर भारतीय संघात निवड होऊन एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेला क्रिकेटपटूही त्याच्या साखरपूड्याच्या बातमीमुळे चर्चेत आहे.
श्रीलंका आणि न्युझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश असलेला पण एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेला गोलंदाज मुकेश कुमार याचा साखरपुडा झालेला आहे. मुळचा बिहार येथील मुकेश कुमार याचा साखरपुडा छपरा येथील दिव्या सिंग हिच्यासोबत झाला आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये मुकेश कुमारचा जन्म झाला असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने दिवस काढले आहेत. कुटुंबाची परिस्थितीही जेमतेम होती. पण त्याच्या जीवनात आयपीएलने एन्ट्री घेतली आणि तो मालामाल झाला.
कोचीत झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला तब्बल साडेपाच कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. बेस प्राईसच्या तुलनेत २८ पटींनी अधिक किंमतीत त्याला खरेदी करण्यात आले. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मुकेश कुमार टीम इंडिया ए कडून खेळला होता. त्यात त्याने चमकदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधले. त्यामुळेच त्याची वर्णी भारतीय संघात लागली. या मालिकेत त्याने अवघ्या दोन सामन्यांमध्ये ९ बळी घेतले होते.
फर्स्ट क्लासमध्येही दमदार कामगिरी
टीम इंडिया-ए कडून मुकेश कुमारने चमकदार कामगिरी केली. पण त्यापूर्वी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली आहे. त्याने ३८ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये १४५ बळी घेतले आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये २४ सामन्यांमध्ये त्याने २६ बळी घेतले आहेत.
हॉटेलमध्ये साखरपुडा
गोपालगंज येथील एका हॉटेलमध्ये मुकेशकुमार आणि दिव्या सिंग यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही जुने मित्र आहेत, असे बोलले जाते. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुकेश कुमार भारतीय क्रिकेटपटू म्हणून देशभरात प्रसिद्ध नसला तरीही त्याची कामगिरी लक्षात घेता लवकरच हो स्टार गोलंदाज म्हणून नावलौकिक प्राप्त करेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Indian Team Cricketer Mukesh Kumar Engagement Ceremony