इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगप्रसिद्ध असलेल्या भारतीय चहाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अनेक देशांनी भारताचा चहा परत पाठविला आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खरेदीदारांनी कीटकनाशके आणि रसायनांच्या अनुज्ञेय मर्यादा ओलांडल्यामुळे चहाची खेप परत केल्याचे इंडियन टी एक्सपोर्टर्स असोसिएशन (ITEA) चे अध्यक्ष अंशुमन कनोरिया यांनी सांगितले आहे.
टी बोर्ड ऑफ इंडिया निर्यातीला चालना देत असतानाच आता भारतीय चहा परदेशातून परत आला आहे. चहाच्या जागतिक बाजारपेठेत श्रीलंकेचे स्थान कमकुवत होत आहे. त्यातच आता भारतीय चहा नाकारण्यात आला आहे. कनेरिया यांनी पीटीआयला सांगितले की, देशात विकल्या जाणार्या सर्व चहाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या नियमांचे पालन केले पाहिजे. तथापि, बहुतेक खरेदीदार विलक्षण उच्च रासायनिक सामग्री असलेल्या चहाची खरेदी करत आहेत. कायद्याचे पालन करण्याऐवजी बरेच जण सरकारला FSSAI निकष अधिक उदार किंवा शिथील करण्याचा आग्रह करत आहेत. परंतु ते चुकीचे संकेत देईल. कारण चहा हे आरोग्य पेय आहे.
कनोरिया यांनी सांगितले की, अनेक देश चहासाठी कठोर नियम पाळत आहेत. बहुतेक देश युरोपियन युनियनचे मानक पाळतात. जे FSSAI नियमांपेक्षा अधिक कठोर आहेत. 2021 मध्ये भारताने 195.90 दशलक्ष किलो चहाची निर्यात केली होती. प्रमुख खरेदीदार कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स (CIS) देश आणि इराण होते. यावर्षी 300 दशलक्ष किलो चहाची निर्यात करण्याचे बोर्डाचे उद्दिष्ट आहे. भारताने 2021 मध्ये 5,246.89 कोटी रुपयांच्या चहाची निर्यात केली आहे.
दरम्यान, तुर्कीने 56877 टन भारतीय गहू परत केला आहे. फायटोसॅनिटरीच्या चिंतेमुळे भारतीय गव्हाची खेप तुर्कीने नाकारली आहे. भारतीय गव्हात रुबेला विषाणू आढळल्याचे कारण तुर्कीने दिले आहे. त्यामुळे ते परत पाठविले आहेत. आणि आता चहा परत पाठविण्यात आला आहे.