इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली की काय ? अशी भीती सर्वांना जगभरात वाटत आहे. त्यातच सातत्याने रशियन सैन्याकडून हवाई हल्ले होत असल्याने येथे असलेले भारतीय विद्यार्थी देखील संकटात सापडले असून तेथेच अडकून पडल्याने आपल्या देशातील पालकांना मोठी चिंता निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इतके विद्यार्थी का जातात ? असा प्रश्न निर्माण होणे सहाजिक आहे, याचे कारण म्हणजे तेथील वैद्यकीय शिक्षण भारतातील शिक्षणापेक्षा स्वस्त आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे तो म्हणजे भारतातील सर्व राज्यातील विद्यार्थी तिथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी का जात आहेत? भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा इतका चांगला नाही की अन्य काही कारण आहे?
युक्रेनच्या उझरोद शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी म्हणाली की, इथे वर्षाला ३८०० डॉलर्स लागतात, त्याचे सुमारे तीन लाख रुपये होतात, तर भारतात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्या चौपट पैसे लागतात. भारतात वैद्यकीय शिक्षण इतके महाग झाले आहे की, ती प्रत्येक कुटुंबाच्या आवाक्यात नाही. सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला तरच कुटुंबाला आपल्या मुलांना एमबीबीएस करून घेता येईल. मात्र प्रवेश मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील कोणत्याही खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व एमबीबीएस अभ्यासक्रमांची फी, निवास व्यवस्था, पुस्तके इत्यादींसह एक कोटी रुपयांच्या आसपास झाली आहे, तर युक्रेनमध्ये ती पंधरा ते वीस लाखांवर आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसची फी प्रतिवर्षी ११ लाख रुपये आहे. मात्र, तेथे नंबर लागत नाही. आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ना जागा वाढवल्या जात आहेत ना नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा युक्रेनकडे असतो.
नवीन महाविद्यालये फक्त खासगी क्षेत्रात उघडली जात आहेत. मात्र त्यांची फी मध्यमवर्गीयच नव्हे तर उच्चवर्गीयांच्याही क्षमतेबाहेरची आहे. त्यामुळेच पैसे वाचविण्यासाठी विद्यार्थी अन्य राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जातात. त्या तुलनेत युक्रेनमधील शिक्षण स्वस्त आहे. त्यामुळे तिथे शिक्षण घेणे योग्य ठरते असे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, युक्रेनमधील सर्व शहरांतून विद्यार्थ्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे. काही राजधानी कीवमध्ये अडकले आहेत. तसेच काही एका बंकरमध्ये लपले आहेत. आता मायदेशी परतण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काहींना बसने हंगेरीला नेले जात आहे, तेथून ते भारतात येणार आहेत.