मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांना पाकिस्तानमध्ये खेळायला भिती वाटते, पण पाकिस्तान जगात कुठेही खेळायला तयार असतो. अगदी भारतातही यायला पाकिस्तानचा क्रिकेट संघ तयारच असतो. मात्र जगात असे एकमेव स्टेडियम आहे, जिथे खेळायला पाकिस्तानला भिती वाटते आणि अर्थातच ते स्टेडियम भारतात आहे.
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतात होऊ घातलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेत २०१९ च्या तालिकेनुसार आठ संघ खेळतील. मात्र अद्याप आयसीसीने संपूर्ण नियोजन जाहीर केलेले नाही. यंदा भारताकडे स्पर्धेचे यजमानपद असल्यामुळे सुरुवातीपासून केवळ एकच विषय चर्चेला होता. आणि तो म्हणजे पाकिस्तान भारतात खेळेल का किंवा पाकिस्तानला भारतात सामने खेळू दिले जातील का? या प्रश्नावर बरीच चर्चा झाली. वादही झाले. पण अखेर पाकिस्तानला भारतात खेळू दिले जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
यात पाकिस्तानच्या वाट्याला चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये खेळणार आहे. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एक नवी अट टाकलेली आहे. त्यात त्यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायला आम्हाला भिती वाटते, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आमचे सगळे सामने कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या ठिकाणी खेळवावे, अशी मागणी पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी केली आहे.
पीसीबीचे आयसीसीला साकडे
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि महाव्यवस्थापक ज्योफ अॅलार्डिस यांनी अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांची भेट घेतली. त्यावेळी पाकिस्तानने नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्याची वेळ येऊ देऊ नका, यासाठी अक्षरशः आयसीसीला साकडे घातले.
या सामन्यांची तयारी
पाकिस्तानला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर साखळी सामने खेळायचे नसले तरीही ते नॉकआऊट किंवा अंतिम सामना खेळायला तयार असतील, असेही पीसीबीने स्पष्ट केले आहे. पाकिस्तान संघाच्या सुरक्षेबाबत चिंता असल्यामुळे अद्याप सरकारने भारतात खेळायला अधिकृत परवानगी दिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
Indian Stadium Pakistan Asia Cup Condition