विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जिनोम सिक्वेन्सिंग विज्ञानात भारतीय वैज्ञानिकांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. वैज्ञानिकांनी प्रथमच कागदाच्या सहाय्याने एका तासाच्या आत कोरोना विषाणूच्या म्युटेशनचा शोध लावण्याच्या तंत्राला विकसित केले आहे. त्याला फेलुदा रे (आरएवाय) असे नाव देण्यात आले आहे. गेल्यावर्षी चाचणीसाठी फेलुदा नावाची चाचणी किट तयार करण्यात आली होती. त्या किटचा आता अनेक राज्यांमध्ये वापर केला जात आहे.
वैज्ञानिक तसेच औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) नवी दिल्लीतील आयजीआयबी संस्थेच्या वैज्ञानिकांनी याच वर्षी जानेवारी ते मे महिन्याच्यादरम्यान रॅपिड व्हेरिएंट डिटेक्शन एसे (रे) तंत्रज्ञानाला विकसित केले आहे. साधारणतः एका नमुन्याच्या जिनोम सिक्वेन्सिंगसाठी खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यासाठी उच्चस्तरीय प्रयोगशाळेची गरज आहे.
भारतात अशा प्रयोगशाळा खूपच कमी आहेत. आता दहा प्रयोगशाळेच सिक्वेन्सिंग सुरू आहे. तर इतर १७ प्रयोगशाळेत आताच सुरुवात झाली आहे. जिल्हा पातळीवर सिक्वेन्सिंगच्या सुविधा नाहीत. सद्यस्थितीत आतापर्यंत देशात ३७ कोटींहून अधिक नमुन्यांची चाचणी झाली आहे. परंतु त्यापैकी
फक्त ३० हजार नमुन्यांची सिक्वेन्सिंग होऊ शकली आहे. देशात डेल्डा व्हेरिएंटसह इतर कोरोनाच्या गंभीर अवतारांनी धुमाकूळ घातलेला असताना ही स्थिती आहे.
असे झाले संशोधन
संशोधनकर्ते देवज्योती चक्रवर्ती यांच्या माहितीनुसार, आयजीआयबीच्या डॉ. सौविक मैत्री आणि डॉ. राजेश पांडे यांच्या देखरेखेखाली डॉ. मनोज कुमार, स्नेहा गुलाटी आदींनी मिळून सिक्वेन्सिंगची सोपी पद्धत जाणून घेण्यासाठी अभ्यास सुरू केला होता. तो आता पूर्ण झाला आहे. सिक्वेन्सिंगसाठी एफएनसीएस९ नावाच्या एका तंत्रात फेलुदा रेचा वापर करण्यात आला आहे. या प्रक्रियेला एका तासाचा वेळ लागतो. त्यानंतर आम्हाला गंभीर म्युटेशनबाबतची माहिती मिळाली. हे तंत्र आतापर्यंतचे सर्वात साधे आणि सोपे आहे. जिनोम सिक्वेन्सिंग तंत्रातील हा बदल देशात सर्वात मोठा बदल घडवू शकतो.
आता पुढे काय
वैज्ञानिक सांगतात, या तंत्रज्ञानाचा वापर भारतात कशा प्रकारे करावा याबाबत अद्याप कोणतीज योजना ठरविण्यात आलेली नाही. परंतु लवकरच यावर काम सुरू होण्याची शक्यता आहे. आयसीएआरसह इतर सर्व संस्थांसोबत चर्चा सुरू झाली आहे. आगामी एक-दोन महिन्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.