नवी दिल्ली – पीक काढल्यानंतरच्या उर्वरित अवशेषांपासून विक्री योग्य जैविक उत्पादन बनविण्याचे तंत्रज्ञान निर्माण केल्याबद्दल इंग्लंड येथील एका समारंभात येथील युवा उद्योजक विद्युत मोहन यांना सन्मानित करण्यात आले आहे. युवराज विलियम यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या पहिल्या पर्यावरणीय अर्थशॉट पुरस्काराने विद्युत मोहन यांचा सन्मान झाला. या पुरस्काराला इको ऑस्कर असेही संबोधले जात आहे. विद्युत मोहन यांच्या ‘टकाचार’ या परियोजनेला पुरस्कारात १० लाख ब्रिटिश पाउंड (१०.३४ कोटी रुपये) प्रदान करण्यात आले आहे.
कृषी अवशेषांचा वापर विक्री योग्य जैविक उत्पादनांमध्ये करण्याच्या परवडणाऱ्या ‘टकाचार’ तंत्रज्ञानाला ‘आमची स्वच्छ हवा’ च्या श्रेणीत विजयी घोषित करण्यात आले. पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रयत्न करणार्या नागरिकांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने ड्यूक ऑफ कॅम्ब्रिज विलियम यांनी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील पाच पुरस्कार विजेत्यांमध्ये विद्युत मोहन यांचा समावेश आहे.
रेकॉर्ड केलेल्या संदेशात विलियम या वेळी म्हणाले, की वेळ जात आहे. एक दशक जास्त लांब वाटत नाही. परंतु मानव जातीकडे अशा समस्यांवर उपाय काढण्याच्या क्षमतेचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याचा उपाय मिळणे अवघड आहे. या समारंभात अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. या वेळी अॅड शिरन तसेच कॉल्डप्ले यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
असे आहे टकाचार
विद्युत मोहन यांच्या टकाचार तंत्रज्ञानाद्वारे धुराचे उत्सर्जन ९८ टक्के कमी केले जाते. हवेची गुणवत्ता राखणे हाच या तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एका वर्षात एक अब्ज टनापर्यंत कार्बन डायऑक्साइडमध्ये कपात होऊ शकते. हवामान बदलाविरोधातील लढाईत भारतीय शेतकर्यांसाठी हा एक विजय मानला जात आहे. जगभरात दरवर्षी आपण १२० अब्ज डॉलरचा कृषी कचरा निर्माण करतो. शेतकरी हा कचरा जाळून टाकतात. त्यामुळे वायू प्रदूषण वाढण्यास हातभार लागतो. टकाचार हे तंत्रज्ञान धूर कमी करण्याचे प्रयत्न करत आहे.
https://twitter.com/UNEP/status/1339556199394492417