इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
आयपीएलचा एक हजारावा सामना
इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ या पुर्णपणे भारतीय बनावटीच्या असलेल्या क्रिकेट स्पर्धेचा एक मोठा टप्पा आज पार पडतो आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणारा सामना, हा आयपीएलच्या इतिहासातील १००० सामना असणार आहे. यासंदर्भात सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे
२००७ साली भारताने टी२० चा विश्वचषक जिंकून एक इतिहास रचला होता. या विजयानंतर भारतात टी२० ची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती आणि याच लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्यावेळी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी असलेले ललित मोदी या एका अस्सल व्यावसायिक माणसाच्या सुपीक संकल्पनेतून आयपीएलचा जन्म झाला. क्रिकेट आणि लोकप्रियता या दोघांच्या जोरावर पैसा कमावण्याची एक नवीन शक्कल म्हणजे ‘आयपीएल’ हे समजायला सगळ्या क्रिकेट जगताला वेळ लागला.
ज्या खेळाची सुरुवात पांढरे शुभ्र कपडे घालून खेळण्याने झाली होती त्या खेळाचे नंतर असे विविध रंग तयार बाहेर येतील आणि त्यासाठी आयपीएल नावाचा महोत्सव साजरा केला जाईल याची कल्पनाही कोणी केली नसावी. या इव्हेंट मध्ये व्यावसायिकता आणण्यासाठी आयोजकांनी कुठलीही कमतरता सोडलेली नाही. अगदी खेळाडूंच्या लिलावाचा सुद्धा इथे इव्हेंट होतो. लाईव्ह स्ट्रीमिंग जाहिराती आणि यासह वेगवेगळ्या माध्यमातून प्रायोजकांच्या आणि फ्रॅंचाईजीच्या खिशातून पैसे काढण्याचं आयपीएल म्हणजे एक मशीन आहे.
महिनाभर चालणारे हे आयपीएल नावाचे युद्ध आता तर ऑनलाइन गेमिंग च्या स्वरूपामध्ये लोकांकडे असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून घराघरात पोहोचू पहातय. १८ एप्रिल २००८ ला राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये पहिला सामना खेळला गेला आणि तिथेच आयपीएलची मुहूर्तमेढ रोवली गेली. सध्या भारतात आयपीएलचा १६वा सीझन खेळला जातोय. गेल्या १५-१६ वर्षात आयपीएल ने फक्त भारतीय क्रिकेटचाच नाही, तर संपुर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाच चेहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे असे धाडसाने म्हणावेच लागेल.
आयपीएलने क्रिकेटच्या चाहत्यांना झटपट क्रिकेटचा एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. फुल टू एंटरटेनमेंट या एकाच संज्ञेभोवती फिरणारे आयपीएल, अवघ्या २० षटकांमध्ये क्षणाक्षणाला पलटणारी बाजी, चौकार षटकारांची रोषणाई आणि अगदी शेवटचा चेंडू पडेपर्यंत सामन्यात टिकणारा थरार ही आता आधुनिक आयपीएलची ओळख बनवून पहाते आहे. यावर्षी खेळल्या गेलेल्या एका सामन्यात केकेआर च्या रिंकू सिंगने सलग पाच षटकार खेचून सामना जिंकताना आयपीएलची लोकप्रियता आणखी एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.
आपल्याला हे माहितीच आहे की, कोविड काळात जवळपास सगळ्याच खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांना कुलूप लागलं होतं. परंतु आयपीएल हा एक असा नमुना आहे ज्याने कोविड काळात सुद्धा आपलं दुकान चालू ठेवलं. खेळाडूंची पुरेशी काळजी घेऊन भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या आणि प्रेक्षक नसलेल्या दुबईच्या मैदानावर आयपीएल पार पडलं. मैदानात भलेही प्रेक्षक नसतील, परंतु जगातल्या लाखो करोडो क्रिकेट चाहत्यांच्या घराघरात टीव्ही समोर बसून लोकांनी आयपीएल बघितलं आणि हीच आयपीएलची मोठी कमाई ठरली.
यंदाच्या सीझनमध्ये १० संघ सामील झाले आहेत. पुढच्या वर्षी या स्पर्धेचे स्वरूप काय असेल? हे आज सांगता येत नाही. मात्र एक नक्की, आणि ते म्हणजे या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीची आयपीएल एक पाऊल नक्कीच पुढे असेल. आयपीएल ने ही परंपरा जपल्यामुळेच १००० सामने खेळण्याचा टप्पा आज पूर्ण होतोय. अर्थात, आयपीएलच्या कारकिर्दीला अजून बरंच अंतर गाठायचा आहे…!
Indian Premier League IPL History Record by Jagdish Deore