नवी दिल्ली – खुद्द देशाचे पंतप्रधान हात धरुन उभे आहेत आणि त्यांच्या समोर एक व्यक्ती खुच्रीवर बसलेली आहे. हे दृष्य पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. देशाचे पंतप्रधान अशा कुणा व्यक्तीजवळ उभे आहेत की जो पंतप्रधानांपेक्षाही मोठा आहे म्हणून तो सहजपणे खुर्चीत बसला आहे. अखेर याचा उलगडा झाला आहे.
शेअर बाजारातील बडे प्रस्थ आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठे नाव असलेले राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एक फोटो पंतप्रधानांनीच ट्विट केला असून ते सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीशी स्वतः पंतप्रधान उभे राहून बोलत आहेत. याचे कुतूहल अनेकांना वाटले आहे. राकेश झुनझुनवाला हे नक्की कोण आहेत ते पाहूयात.
महाविद्यालयीन जीवनातच ट्रेडिंग
फोर्ब्सच्या जुलै २०२१ च्या यादीनुसार झुनझुनवाला यांची संपत्ती ४.६ बिलियन डॉलर्स (३४ हजार ३८७ कोटी रुपये) इतकी आहे. त्यावरून त्यांच्या गुंतवणूक क्षेत्रातील स्थानाचे महत्त्व कळू शकेल. एका आयकर अधिकार्याच्या घरात जन्म घेतलेल्या राकेश झुनझुनवाला (वय ६१) यांनी १९८५ पासूनच ट्रेडिंगला सुरुवात केली. त्यावेळी ते महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी पाच हजारांची गुंतवणूक करून ट्रेडिंगला सुरुवात केली होती.
शेअर बाजारात भरारी
शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखल्या जाणार्या राकेश झुनझुनवाला यांनी ९० च्या दशकात हर्षद मेहता यांच्या काळात चांगला नफा कमावला होता. पण शेअर बाजारात झालेल्या घोटाळ्यात त्यांना मोठा फटकाही बसला होता. झुनझुनवाला यांनी १९८६ मध्ये टाटा टीचे पाच हजार शेअर्स विकत घेतले होते. त्यावेळी शेअर्सची किंमत १४३ रुपयांपर्यंत वाढली. त्यामुळे त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तिपटीहून अधिक पैसा कमावला.
या कंपन्यांमध्ये गुंतवणूक
राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या सहकार्यांनी ३१ मार्च २०२१ च्या तिमाहीत ३७ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये टाटा कम्युनिकेशन, डीबी रिअॅलिटी, डेल्टा क्रॉप, फेड्रल बँक, नाझरा टेक्नोलॉजीज, फोर्टीस हेल्थकेअर, क्रिसिल, लिपिन, टाटा मोटर्स, टायटन यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. घड्याळे आणि दागिने बनविणार्या टायटन कंपनीमध्ये झुनझुनवाला यांचा सर्वाधिक ७ हजार ८७९ कोटींचा वाटा आहे. त्यानंतर टाटा मोटर्समध्ये १ हजार ४७४ कोटी ४० लाख तसेच क्रिसिलमध्ये १ हजार ६३ कोटी २० लाखांचा वाटा आहे.