विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/मुंबई
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्या जहाजातून तीन हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीची अमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले आहेत. सदर जहाज मूळचे परदेशी आहे, अशी माहिती संरक्षण प्रवक्त्याने सोमवारी दिली.
या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय नौदलाचे जहाज ‘सुवर्णा’ हे अरबी समुद्रात पाळत ठेवण्याच्या गस्तीवर होते आणि त्याचवेळी त्याला एका मासेमारी करणारे जहाज संशयास्पद स्थितीत जात होते. सदर जहाजाची भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता सुमारे ३०० किलोग्रामपेक्षा जास्त मादक पदार्थ आढळले. या जहाजावरील सदस्यांना जवळच्या कोची बंदरात नेण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या अंदाजे मूल्य सुमारे ३ हजार कोटी रुपये आहे. सदर ड्रग्ज कुठून किंवा कोणत्या लोकांकडे नेले जात होते, हे मात्र कळू शकले नाही. परंतु भारतीय, मालदीव आणि श्रीलंका किनारपट्टीच्या भागात जाणाऱ्या जहाजातून अवैध मादक द्रव्यांच्या वाहतुकीचे प्रकार घडतात, त्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने ही मोठी कारवाई आहे.