विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतीय नौदलामुळे अरबी समुद्रात अकडलेल्या शेकडो जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यासाठी नौदलाने अत्यंत शिस्तबद्धपणे रेस्क्यू ऑपरेशन राबविले. दिवसा आणि मध्यरात्री हे ऑपरेशन राबविण्यात आले. या धाडसी ऑपरेशनमुळे नौदलाची कामगिरी देशभरात कौतुकाचा विषय ठरली आहे.
मुंबई हायच्या मध्ये समुद्रात बुडालेल्या २६ बेपत्ता नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे, तर दुसरीकडे गुजरातमध्ये या वादळाने आतापर्यंत ४५ लोकांचे प्राण घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि दीवमध्ये वादळामुळे झालेल्या वाताहतीचा आढावा घेतला. त्याचवेळी वादळात अडकून बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्याची मोहीम कुठपर्यंत आली, याचीही माहिती त्यांनी घेतली. तौक्ते वादळामुळे ज्या ज्या राज्यांमध्ये नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदतनिधी देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.
मुंबई हाय येथे मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नावेला फटका बसल्याने अनेक लोक बेपत्ता आहेत. त्यातील केवळ २६ लोकांचे मृतदेह हाती लागले आहे. इतरांचा शोध अद्याप सुरू आहे. नावेवर असलेल्या सर्वांनीच लाईफ जॅकेट घातलेले होते, त्यामुळे बेपत्ता असलेले लोक जीवित सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सोमवारी घटना घडली तेव्हा नावेवर २६१ लोक असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती.
तेल तसेच गॅस कंपनी ओनएजीसीची तेलाची विहीर असलेल्या ठिकाणी अँकल लावून ही नाव उभी होती. सोमवारी सकाळी जोरदार वादळ आल्याने नाव लाटांमध्ये वाहायला लागले. यावर २६१ लोक होते. पण नावेला मोटर लागलेली नसल्याने तिच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले.
या नावेवरील क्रू मेंबर्सचे म्हणणे आहे की नाव एका मोठ्या खडकाला धडकल्याने तिच्या तळाशी छिद्द पडले. त्यानंतर सर्वांना लाईफ जॅकेट घालण्याचे निर्देश देण्यात आले. पण सायंकाळपर्यंत नाव डुबायला लागली तर सर्वांना पाण्यात उडी घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. त्यानंतर कित्येक तास जीव वाचविण्यासाठी पाण्यावर हातपाय मारणाऱ्या अनेकांचे जीव वाचविणे नौदल आणि कोस्टगार्डच्या चमूला शक्य झाले.
https://twitter.com/DefPROMumbai/status/1394879837639118849