इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
२०२५ च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार आहे. याअंतर्गत खाली नमूद ठिकाणी संध्याकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत हे सादरीकरण केले जाईल :
- ११ ऑगस्ट २०२५ रोजी फ्लोरा फाउंटन, फोर्ट
- १४ ऑगस्ट २०२५ रोजी बांद्रा फोर्ट ॲम्फीथिएटर
- १५ ऑगस्ट २०२५ रोजी गेटवे ऑफ इंडिया
बँडचे हे सादरीकरण कार्यक्रम सामान्य जनतेलाही पाहण्यासाठी खुले असतील. देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्राभिमान वृद्धिंगत करणे, हा या सादरीकरणांचा उद्देश आहे. नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रोत्साहनपर आवाहनही केले जात आहे.
भारतीय नौदल बँडची सुरुवात १९४५ मध्ये झाली होती. त्यावेळी काही नौदलातील काही मोजक्या संगीतकारांसह या बँडची स्थापना केली गेली होती. गेल्या काही वर्षांत, या बँडने देशभरातील तसेच विशेषतः भारतीय नौदलाची युद्धनौका परदेशी मोहिमांवर असताना जगभरातील श्रोत्यांचे मनोरंजन करत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.
विविधता हे भारतीय नौदलाच्या बँडचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहवर्धक लष्करी संगीत, सिम्फनी, ओव्हर्चर, कॉन्सर्टो, भारतीय शास्त्रीय संगीत आणि पॉप तसेच लोकसंगीत यांसारख्या अनेक समकालीन प्रकारांचा अंतर्भाव असतो.