नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिन्यात भारतीय हद्दीतून चुकून क्षेपणास्त्र डागून ते पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. या घटनेवरून पाकिस्तानने भारतावर आगपाखड केली होती. परंतु भारताने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, लवकरच दोषींवर कारवाई होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये चुकून क्षेपणास्त्र कोसळण्याच्या घटनेची चौकशी भारतीय हवाई दलाने पूर्ण केली आहे. या प्रकरणात एकापेक्षा अधिक अधिकाऱ्यांची चूक होती. तसेच क्षेपणास्त्राच्या निरीक्षणादरम्यान एसओपीकडे लक्ष देण्यात आले नाही, असे चौकशी अहवालात म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ९ मार्च रोजी हरियाणातील सिरसा येथून चुकून एक क्षेपणास्त्र डागले गेले होते. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानमधील खनेवाल जिल्ह्यातील मियाँ चुन्नू भागात कोसळले होते. क्षेपणास्त्रामध्ये शस्त्र नसल्यामुळे तिथे कोणतेही नुकसान झाले नाही. या घटनेनंतर एअर व्हाइस मार्शल आर. के. सिन्हा यांच्याकडे प्रकरणाची चौकशी सुपूर्द करण्यात आली होती. आता ही चौकशी पूर्ण झाली आहे.
हवाई दलाच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले, की या घटनेसाठी एकाहून अधिक अधिकारी दोषी आढळले आहेत. दोषी अधिकाऱ्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांनी क्षेपणास्त्र संचालन प्रक्रियेच्या निकषांचे स्पष्ट उल्लंघन केल्याचे कोर्ट ऑफ इन्क्वायरमध्ये निष्पन्न झाले आहे.
पूर्वी झालेल्या अनेक घटनांमध्ये शिक्षा देण्यास टाळाटाळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेस दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना टाळाटाळ न करता त्वरित शिक्षा होणे आवश्यक आहे, असे भारतीय हवाई दल आणि केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. चौकशी समितीच्या अहवालाबाबत संरक्षण मंत्रालयाला सूचित करण्यात आले आहे. काही आठवड्यात पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
या घटनेवरून पाकिस्तानने मोठा गोंधळ घालून, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय मंचांवर उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय चौकशीबाबत पाकिस्तान सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु भारतीय क्षेपणास्त्र प्रणाली विश्वासार्ह आणि सुरक्षित असून, या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिले होते.