नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव आजपासून दिसून येणार आहे. हे चक्रीवादळ 12 किमी प्रतितास वेगाने किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेने पुढे जात आहे. आसनीच्या प्रभावामुळे ताशी 60 किमी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चक्रीवादळ जेव्हा धडकेल तेव्हा किनारी भागात ताशी तब्बल १२० किमी वेगाने वारे वाहणार आहेत, तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आंध्र-ओडिशा किनार्यावरून आज म्हणजेच 10 मे रोजी पश्चिम-मध्य आणि वायव्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच ते ईशान्येकडे वळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 12 किमी प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे आणि पुरीपासून सुमारे 590 नैऋत्य-पश्चिम आणि गोपालपूर, ओडिशाच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 510 किमी अंतरावर आहे.
हवामान खात्याने म्हटले आहे की, पश्चिम मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरात समुद्राची स्थिती खूप तीव्र होण्याची शक्यता आहे. या अशा परिस्थितीमुळे मच्छिमारांना दि. 13 मे पर्यंत किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आसनी चक्रीवादळाचा प्रभाव बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील जिल्ह्यांवरही दिसून येईल. तसेच दि. 11 आणि 12 मे रोजी पूर्व उत्तर प्रदेशातही जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 14 मेपर्यंत पाऊस पडू शकतो.
हवामान खात्यानुसार, गोरखपूर, महाराजगंज, कुशीनगर, बस्ती, आझमगड, बलरामपूर, श्रावस्ती, बलियासह लगतच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये 14 मेपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
– चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात समुद्र खवळलेला राहील.
– दि.10 मे रोजी संध्याकाळी अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पडेल. मात्र, ओडिशातील गजपती, गंजम आणि पुरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– दि.11 मे रोजी गंजम, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर आणि कटक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो.
– दि.12 मे रोजी पुरी, जगतसिंगपूर, कटक, केंद्रपारा, भद्रक, बालेश्वर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. या वेळी ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.