नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’ असे एक बालगीत तथा बडबड गीत शाळेत असताना प्रसिद्ध होते. कालांतराने भोलानाथची जागा म्हणजेच अंदाज सांगणाऱ्या नंदीबैलाची जागा हवामान खात्याने घेतली आहे, परंतु जेव्हा शाळेभोवती तळे साचेल असे हवामान खाते सांगते, तेव्हा पाऊस पडतच नाही असे म्हटले जाते. हवामान खात्याने पावसाचा अचूक अंदाज वर्तवणे वर्तवणे आवश्यक ठरते, अशी अपेक्षा संपूर्ण भारतीय नागरिकांकडून व्यक्त होते. परंतु भारतीय हवामान खात्याचे अंदाज कधीच अचूक ठरत नाही असा आरोप करण्यात येतो, खुद्द माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील हवामान खात्याच्या अंदाजावर टीका केली आहे.
हवामान खात्याने जेव्हा पाऊस सांगितलेला असतो, तेव्हा चक्क ऊन पडते आणि शाळेला सुट्टी जाहीर केल्यावर पाऊस पडतच नाही, असे देखील अजित पवार म्हणाले होते खुद्द हवामान खात्याने देखील आपल्या अंदाज चुकल्याचे कबूल केले आहे. अलीकडे हवामान खात्याचा अंदाज चुकत आहे. यावरुन सोशल मिडीयावर अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकत असल्याची कबुली भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनीच दिली आहे. यामागचे कारण देखील त्यांनी सांगितले आहे. हवामान बदलामुळे वातावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. या बदलांमुळे अचूक अंदाज घेण्याच्या हवामान खात्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. परिणामी अंदाज चुकत असल्याचे महापात्रा म्हणाले.
येत्या चार दिवसात देशात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे . दक्षिण किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोवा, ओडिशा येथे जोरदार पाऊस पडणार आहे. दक्षिण किनारपट्टीसह गोव्याला 8 ते 10 ऑगस्ट तर ओडिशाला 8 ते 9 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गुजरात, छत्तीसगड, गोवा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यालाही येत्या तीन दिवसांदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा राज्यात जोर वाढणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कोलकाता, शिमला, पुणे आणि नवी दिल्ली अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे. पुण्यातील सध्याची इमारत अजूनही हवामान निरीक्षणात कार्यरत आहे.
पुण्यातील शिवाजीनगरच्या शिमला ऑफिस चौकात, आकाशवाणीच्या इमारतीसमोर, शिमला ऑफिसमध्ये भारतीय हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी) कार्यालय आहे. भारत हा जगातील सर्वांत जुन्या हवामान वेधशाळा असलेले ठिकाण म्हणून ओळखला जातो. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने अनुक्रमे १७८५ आणि १७९६ मध्ये तत्कालीन कलकत्ता आणि मद्रास इथे वेधशाळा स्थापन केल्या आहेत. आयएमडी ही भारत सरकारच्या अर्थशास्त्र मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक यंत्रणा आहे. हवामानाची निरीक्षणे, हवामानाचा अंदाज आणि भूकंपशास्त्र यावर ती काम करते आता ‘आयएमडी’च्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्रीय सेवांचे पुणे हे केंद्र आहे. पुढील काही तासांपासून ते मान्सून किंवा ऋतूंचे हंगामी अंदाज विविध मॉडेलच्या साह्याने पुण्यात तयार केले जातात.
शेतकरी, प्रशासन, धरण व्यवस्थापन, ऊर्जा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांना अपेक्षित असणारे नेमके अंदाजही ‘सीआरएस’कडून दिले जातात. देशभरातून जमा होणाऱ्या हवामानाच्या नोंदींचे संकलन करून तत्काळ त्या संग्रहित करण्याची व्यवस्था आयएमडी पुणेकडे आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये हवामानशास्त्रीय सुविधांचा दर्जा वाढावा, यासाठी जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या निर्देशानुसार पुण्यात केंद्र सुरू झाले आहे. भारताच्या शेजारी देशांनाही हवामान अंदाज देण्याचे काम पुण्यातून चालते.
यापूर्वी येथे हजारपेक्षा अधिक मनुष्यबळ होते. सध्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कर्मचारी मिळून साडेपाचशे लोक सिमला ऑफिसच्या आवारात काम करतात. दिल्लीनंतर एवढे मोठे मनुष्यबळ पुणे केंद्राकडेच आहे. आयएमडीचे मुख्य काम हवामानाच्या नोंदी आणि हवामानशास्त्रीय सेवा देणे हे आहे. आणि त्याच्याशीच संबंधित आयएमडीचे राष्ट्रीय केंद्र पुण्यात आहे. जगभरातील हवामान संस्था त्यांचे मॉनिटरिंग नेटवर्क आणि हवामान अंदाज मॉडेल सुधारण्यावर भर देतात. देशात मान्सूनच्या पावसाचा कोणताही स्पष्ट कल नाही, परंतु वातावरणातील बदलामुळे मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, तर हलक्या पावसाच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे महापात्रा यांनी सांगीतले.
सन 1970 पासून आतापर्यंतच्या दैनंदिन पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण करत महापात्रा यांनी सांगीतले की, देशात मुसळधार पावसाच्या दिवसांत वाढ झाली आहे, तर हलक्या किंवा मध्यम पावसाच्या दिवसांत घट झाली आहे. पाऊस पडत नसेल तर अजिबात होत नाही. आणि जर पाऊस पडत असेल तर खूप पडतो. जेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते तेव्हा पाऊस अधिक तीव्र असतो.
भारतासह उष्णकटिबंधीय पट्ट्यातील हा सर्वात महत्त्वाचा ट्रेंड आहे. अतिवृष्टीचे प्रमाण वाढणे आणि हलक्या पावसाचे दिवस कमी होणे हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचे अभ्यासांनी सिद्ध केले आहे.
1901 पासून आतापर्यंतच्या मान्सूनच्या पावसाची आकडेवारी नुसार मान्सूनमध्ये बदल झाल्याचे दिसते. या अंतर्गत, उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होत आहे, तर पश्चिम राजस्थानसारख्या पश्चिमेकडील काही भागात पावसात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मोसमी पावसाचा काही अंदाज नाही. मान्सून अनियमित असून यात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पहायला मिळाले. 27 जुलै रोजी केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय आणि नागालँडमध्ये गेल्या 30 वर्षांत (1989 ते 2018 पर्यंत) नैऋत्य मान्सूनच्या पावसात लक्षणीय घट झाली आहे. या पाच राज्यांमध्ये आणि अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही वार्षिक सरासरी पर्जन्यमानात लक्षणीय घट झाल्याचे त्यात म्हटले होते.
पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट म्हटलं तर तो बहुधा घाटमाथ्यासाठीच असतो. कुलाबा वेधशाळा त्यासंबंधी स्पष्टपणे सांगते, अशी माहिती पुण्यातील हवामान विभागाचे शास्रज्ञ आणि अंदाज प्रमुख डॉ. अनुपम काश्यपि यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘पुणे शहरात बुधवारी मुसळधार तर गुरुवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. तसाच पाऊस पडला. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी शाळा बंद ठेवल्या होत्या. पुणे शहरासाठी कधीच रेड अलर्ट नव्हता, फक्त एका दिवसासाठी यलो अलर्ट होता. आम्ही अचूकच अंदाज वर्तवला होता.’’
खरे म्हणजे रेड अलर्ट म्हटलं की लोकांना २६ जुलै २००५ ची आठवण होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरते. भारत हा उष्णकटिबंधीय क्षेत्रात आहे. त्यामुळे हवेच्या चलन-वलनात अचूकता नाही. त्यातही आपण जे मॉडेलिंग वापरतो ते भारतात तयार केलेले नाही. त्यामुळे हवामान अंदाज हे ढोबळमानाने दिलेले असतात, असे ज्येष्ठ हवामानशास्त्र डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.
Indian Meteorological Department Forecast Accuracy Mistake DG