विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप पाहता देशव्यापी लॉकडाउन लावण्याची पुनर्मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. देशातील कोरोना महामारीमुळे उद्भवेललr भयानक परिस्थिती हाताळताना आरोग्य मंत्रालय सुस्त पडले असून, केंद्राने लॉकडाउनचा आमचा प्रस्ताव कचरापेटीत टाकून दिल्याची खंत आयएमएने व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे निर्माण होणार्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयाने आता तरी झोपेतून जागे होत संसर्गाचा सामना करावा, असे आयएमएने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालय योग्य पावले उचलत नसल्याबद्दल आयएमएकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
कोरोनाच्या जीवघेण्या महामारीविरोधात पावले उचलताना देशभरात लॉकडाउन लावण्याचा सल्ला आयएमएकडून देण्यात आला होता. परंतु त्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या कार्यशैलीवरून आयएमएकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
सरकारकडून जे काही निर्णय घेतले जात आहेत, त्यांचे जमिनी परिस्थितीशी काहीच देणेघेणे नाही. गेल्या वीस दिवसांपासून केंद्र सरकारला नियोजन करून लॉकडाउन लावण्याची मागणी आयएमएकडून करण्यात येत आहे. परंतु सरकारकडून त्यावर कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राज्यांकडून वेगवेगळे लॉकडाउन लावल्याने काहीच उपयोग नाही. रात्रीची संचारबंदी लावल्याने कोणताच फायदा होणार नाही, असे आयएमएने म्हटले आहे. डॉक्टरांना सुविधा आणि वेळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आमचा सल्ला ऐकला असता तर देशात ४ लाख रुग्ण रोज आढळले नसते, असेही आयएमएने सांगितले.