विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नसून काही राज्यात संसर्ग प्रकरणेही वाढली आहेत. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे आणि धार्मिक यात्रा अधिक घातक ठरू शकते. त्यामुळे सरकारने पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवावीत असा सल्ला व इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिला आहे. दरम्यान, ओडिशा तील जगन्नाथ रथयात्रा तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मधील काही यात्रांना परवानगी दिल्याने आयएमएने नाराजी व्यक्त केली आहे.
आयएमएने सोमवारी कोविड -१९ प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याबाबत सरकारचे दुर्लक्ष आणि लोकांच्या हलगर्जीपणाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच मोठ्या सभा, संमेलन सारख्या घटना साथीच्या तिसर्या लाटेचे मुख्य कारण बनू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्य सरकारांकडे अशी मागणी केली आहे की, कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी केलेले कडक सुरक्षा उपाय अद्याप शिथिल करू नयेत. पर्यटन, तीर्थक्षेत्र आणि धार्मिक स्थळी लोकांनी भेट देणे, सध्या योग्य नाही. अशा गोष्टींसाठी आता किमान तीन महिने थांबावे. कारण धार्मिक तीर्थक्षेत्र कोरोनाचा संसर्ग वाढविण्यामध्ये सुपर स्प्रेडरची भूमिका बजावू शकतात.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे.ए. जलाल यांनी सांगितले की, दुसर्या लाटेचा प्रतिबंध केल्यावर डॉक्टर आता त्यातून थोडेसे बाहेर आले आहेत. अशा वेळी, देशातील विविध ठिकाणी लोक प्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि सर्व सामान्य लोक कोरोना संरक्षणाच्या नियमांचे योग्य पालन करीत नाहीत आणि गार्दीत आणि सभेत सहभागी होत आहेत. वास्तविक पर्यटन आणि धार्मिक सहलींसारख्या घटनांमुळे होणारे आर्थिक नुकसान कोरोनामुळे होणारे आर्थिक नुकसान आणि दुष्परिणामांपेक्षा कमी आहे. म्हणूनच प्रतिबंधात्मक नियमांचे योग्य प्रकारे पालन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे
एका निवेदनात आयएमएने म्हटले आहे की, पर्यटनस्थळ , तीर्थक्षेत्र, धार्मिक ठिकाणे येथे काही उत्साही लोकांची नेहमी गर्दी होत आहे परंतु ते आणखी काही महिने थांबू शकतात. सर्वांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. यावेळी प्रत्येकाने तिसरी लाट येण्याची शक्यता कमी करण्यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे ओडिशाच्या पुरीमध्ये वार्षिक रथयात्रा तसेच उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कंवर यात्रेला परवानगी देण्यात आल्याने आयएमएच्या वतीने सदर निवेदन आले आहे. तसेच सर्व राज्यांनी जनतेची गर्दी थांबविण्याचे आवाहन केले आहे.