मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने या इंधनावरील दुचाकी आणि चारचाकी वाहने कोणालाही परवडेनाशी झाली आहेत. त्यामुळे सहाजिकच अनेक लोक दुचाकी ऐवजी सायकलचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळेच इलेक्ट्रिक क्षेत्रातही ई-सायकलींची मागणी वेगाने वाढत आहे. देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक सायकल उत्पादक नाहक मोटर्सने अलीकडेच आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक सायकली सादर केल्या असून त्यांची बुकिंग सुरू केली.
होम डिलिव्हरीही लवकरच
अवघ्या दहा दिवसातच कंपनीने या सायकलच्या १,५०० हून अधिक युनिटसाठी बुकिंग नोंदविली आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वीच पहिल्या टप्प्याचे बुकिंग सुरू केले होते आणि बुकिंगचा हा आकडा २ जुलै ते ११ जुलै दरम्यानचा आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक सायकल भारतात तयार केली आहेत, त्यांची नावे आहेत गरूड आणि झिप्पी असून या सायकलच्या बुकिंगबरोबरच कंपनीने त्यांची होम डिलिव्हरीही सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या गरुड मॉडेलची किंमत ३१,९९९ रुपये आणि झिप्पी मॉडेलची किंमत ३३,४९९ रुपये आहे. आपण ही सायकल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर बुक करू शकता. यासाठी काही महत्त्वाचे तपशील ऑनलाईन भरावे लागतील. बुकिंगची रक्कम म्हणून फक्त २,९९९ रुपये जमा करावे लागतील.
परदेशात मागणी
या दोन्ही मॉडेल्सला भारताच्या पश्चिम आणि दक्षिण भागांत सर्वाधिक मागणी असल्याचा कंपनीचा दावा असून या भागांमधून सुमारे ७३ टक्के या सायकलचे सर्वाधिक बुकिंग करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त परदेशातही या सायकलींची मोठी मागणी आहे. कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण बुकिंगपैकी ९ टक्के बुकिंग जर्मनी, यूके, कॅनडा, नेपाळ आणि बांगलादेश या देशांकडून प्राप्त झाली आहे.
अशी आहे सायकल
दोन्ही मॉडेलला विद्युत चक्र फिरण्यायोग्य ली-आयन बॅटरी, एलसीडी डिस्प्ले आणि पेडल सेन्सर तंत्रज्ञानासह देण्यात येतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार या इलेक्ट्रिक सायकलींची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे ३ तास लागतात. एकदा पूर्णपणे चार्ज झाले की, ही सायकल ४० किलोमीटरपर्यंत धावू शकते. सायकलींच्या निर्मितीमध्ये मिश्र धातुच्या स्टीलच्या फ्रेमचा उपयोग केला गेला आहे, तो वजनाने हलका असून मजबूत असतो.