नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आयआयटी मद्रासचा विभाग, टांझानियाच्या झांझिबार इथे स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली. भारत सरकारचा शिक्षण विभाग, आयआयटी मद्रास आणि झांझिबार इथले शिक्षण प्रशिक्षण विभाग तसेच त्यांचे शिक्षण मंत्रालय, यांच्यात हा करार झाला.परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, झांझिबारचे अध्यक्ष हुसेन अली म्विनी, यांच्या उपस्थितीत हा करार झाला. आयआयटीचा हा भारताबाहेरील हा पहिलाच परिसर असेल. हा करार म्हणजे, भारत आणि टांझानिया यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीचे प्रतिबिंब आहे. संपूर्ण आफ्रिका आणि ग्लोबल साऊथमध्ये लोकांशी संबंध निर्माण करण्यावर भारताने आपले लक्ष केंद्रित केले आहे.
आयआयटी मद्रास- झांझिबार कॅम्पस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे हा उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक प्रारंभ आहे, अशी भावना, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली. टांझानिया येथील भारताचे उच्चायुक्त बिनया श्रीकांता प्रधान,आयआयटी मद्रास, चे अधिष्ठाता (ग्लोबल एंगेजमेंट) प्रा. रघुनाथन रेंगास्वामी, आणि झांझिबारचे कार्यकारी प्रधान सचिव खालिद मसूद वजीर यांनी दोन्ही सरकारांच्या वतीने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आंतरराष्ट्रीयीकरणावर लक्ष केंद्रित करत असून, या अंतर्गत उच्च कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यापीठांना इतर देशांमध्येही परिसर स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. झांझिबार- टांझानिया मधील आयआयटी परिसराची कल्पना जागतिक दर्जाची उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणून केली गेली आहे. ज्यामध्ये उदयोन्मुख जागतिक गरजांना प्रतिसाद देण्यासाठी क्षमता विकसित करणे, राष्ट्रांमधील संबंध दृढ करणे आणि या क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पना यांना समर्थन देणे हे या कराराचे व्यापक ध्येय आहे. भारतीय उच्च शिक्षण आणि नवोन्मेषाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांचे दर्शन या उपक्रमामुळे जगाला घडेल.