इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नवनवीन प्रतिभावान गायकांना संधी देऊन प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी छोट्या पडद्यावर अनेक रिऍलिटी शो आहेत. ‘इंडियन आयडॉल’ हा त्यातीलच एक महत्त्वाचा शो. या कार्यक्रमाचा तेरावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘इंडियन आयडॉल’ या शोमध्ये स्पर्धकांची निवड त्यांच्या प्रतिभेमुळे नाही तर त्यांच्या भावनिक कहाणीमुळे होते, असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळेच खळबळ उडाली आहे. हा शो बॉयकॉट करण्याचीही मागणी होते आहे.
नुकतेच या शोचे ऑडीशन्स पूर्ण झाले असून शोसाठी अंतिम १५ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रीतो रीबा या स्पर्धकाची निवड न झाल्याने चाहते नाराज आहेत. यामुळे शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत होती. आता जेम्स लिबांग नावाच्या एका सोशल मीडिया युजरने त्याच्या इन्स्टा हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘इंडियन आयडॉल’ची रिॲलिटी सांगताना दिसतोय.
एक स्पर्धक इंडियन आयडॉलच्या शोमध्ये ऑडिशन देण्यासाठी येतो. तो ऑडिशनमध्ये एकदम मस्त परफॉर्म करतो, आणि त्याच्या गायकीने परीक्षकसुद्धा खूश होतात. असं असूनही ते त्याची निवड करत नाहीत, असं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यानंतर एक असा स्पर्धक ऑडिशनसाठी येतो, जो फार काही छान गात नाही, मात्र तो परीक्षकांसमोर रडून त्याची भावनिक कहाणी सांगतो.
मी अत्यंत गरीब आहे, माझ्या घरी जेवायला देखील काही साधने नाहीत. माझ्या वडिलांचा पाय तुटला आहे, असं तो सांगतो. त्याची ही हृदयद्रावक कथा ऐकून परीक्षकसुद्धा भावूक होतात आणि त्याची निवड करतात. ‘इंडियन आयडॉल’मध्ये स्पर्धकांची निवड त्यांच्या प्रतिभेमुळे नाही तर त्यांच्या भावनिक कहाणीमुळे होते, हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून केला गेला. ‘रिॲलिटी शोची रिॲलिटी’ असं कॅप्शन देत संबंधित युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
विशेष म्हणजे रीतो रीबाने स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. रीतो रीबा हा अरुणाचल प्रदेशमधला गायक आणि संगीतकार आहे. रीतोची गायकी प्रेक्षकांना आणि इंडियन आयडॉलच्या परीक्षकांनाही खूप आवडली. मात्र तरीही त्याची अंतिम १५ मध्ये निवड झाली नाही, म्हणून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या ऑडिशनदरम्यान परीक्षक हिमेश रेशमियाने रीतोला स्वत:चं गाणं गाण्यास सांगितलं. तेव्हा रीतोने स्वत: संगीतबद्ध केलेलं गाणं गाऊन दाखवलं. त्याचं हे गाणं प्रेक्षकांनाही खूप आवडलं होतं.
या व्हिडीओवरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. इंडियन आयडॉल हा स्क्रिप्टेड शो आहे असा आरोप नेटकरी करत आहेत. रीतोचा स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा आहे. सोशल मीडियावर त्याला फॅन फॉलोईंग आहे.
Indian Idol Reality Show Boycott Demand Controversy
Entertainment TV