टोकियो (जपान) – ऑलिम्पिकमधील गुरुवारचा दिवस भारतीय हॉकीसाठी ऐतिहासिक ठरला. भारताच्या पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर पदकावर शिक्कामोर्तब केले. रोमहर्षक सामन्यात जर्मनीचा ५-४ असा धुव्वा उडवून कास्य पदक मिळविले. भारतीय संघ १-३ असा पिछाडीवर असतानाही जिगरबाज खेळी करत जर्मनीवर मात केली. यापूर्वी भारताने मॉस्को ऑलिम्पिकमध्ये १९८० साली सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
या सामन्यात जर्मनीने दुसर्याच मिनिटाला गोल करून पहिल्या क्वार्टरपर्यंत १-० अशी आघाडी घेतली होती. यादरम्यान जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारताच्या भक्कम बचावामुळे ते गोल करू शकले नाही. दुसर्या क्वार्टरमध्ये भारताने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. नंतर जर्मनीने पाठोपाठ गोल करून ३-१ अशी आघाडी घेतली.
यादरम्यान भारताच्या हातून सामना जातो की काय अशी परिस्थिती असताना भारताने गोल करून ३-३ अशी बरोबरी केली. तिसर्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच गोल केल्याने भारताला ४-३ आणि नंतर आणखी गोल करून ५-३ अशी आघाडी मिळविली. अखेरपर्यंत भारताने आघाडी कायम ठेवली. टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहता भारत आणि जर्मनी तुल्यबळ दिसले. परंतु ग्रुप सामन्यांमध्ये भारताची कामगिरी सरस झाली.