इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना, गायक – गायिकांना आज कोट्यवधींच्या घरात मानधन दिले जाते. ज्या परिश्रमांच्या बळावर त्यांनी हे स्थान पटकावले आहे, त्याचीच ती एकप्रकारे पोचपावती आहे. अर्थात हे त्यांचे आजच्या काळातील मानधन आहे. मात्र, जर तुम्हाला सांगितलं की, जवळपास १०० वर्षांपूर्वी भारतात अशी एक गायिका होती जिला एका गाण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन मिळत होते.
कोण होती गायिका?
१८७३ मध्ये भारतात एक गायिका होऊन गेली जी त्या काळात एका गाण्यासाठी १ कोटी रुपये मानधन घेत असे. या गायिकेला भारतातील पहिली करोडपती गायिका म्हटले जायचे. ही गायिका कोण होती, तुम्हाला माहित आहे का? गौहर जान असे त्यांचे नाव आहे. २६ जून १८७३ रोजी जन्मलेल्या गौहर या गाणे रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या गायिका होत्या. मात्र, त्यांचे मानधन प्रचंड होते. त्यामुळे त्यांना साइन करण्यासाठी संगीतकार घाबरत असत. मिळालेल्या माहितीनुसार, १० ग्रॅम सोन्याची किंमत जेव्हा २० रुपये होती, त्या काळात गौहर जान गाणे रेकॉर्ड करण्यासाठी ३ हजार रुपये आकारत होत्या. आजच्या महागाईच्या दरानुसार पाहायचे तर ही रक्कम प्रति गाणे सुमारे एक कोटी रुपये होईल. गौहर जान या भारतातील पहिल्या करोडपती असणाऱ्या गायिका होत्या. १९०२ ते १९२० दरम्यान, गौहर जान यांनी दहा भाषांमध्ये जवळपास ६०० गाणी गायली आहेत.
लोकप्रिय गायिका
गौहर जान या त्या काळातील लोकप्रिय गायिका होत्या. त्यामुळे त्यांची गाणी ऐकणे सर्वांनाच आवडायचे. त्यामुळे ग्रामोफोन कंपनीने त्यांची गाणी रेकॉर्ड करून उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे, त्यांना कार्यक्रमासाठी बोलावणं यायचं तेव्हा त्या खासगी रेल्वेने तिथे जायच्या. प्रचंड मानधन आकारणाऱ्या गौहर जान यांच्याकडे त्याकाळी सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने होते. एकदा घातलेला दागिना त्या परत कधीच घालत नसत, अशी आठवण त्यांच्याबाबत सांगितली जाते.
वैयक्तिक आयुष्य त्रासाचे
व्यावसायिक आयुष्यात कितीही यशस्वी असल्या तरी गौहर जान यांचे बालपण संघर्षमय होते. सरळसाधे, सहज सोपे असे त्यांचे बालपण नव्हते. इंग्रज वडील आणि आर्मेनियम आई यांच्या पोटी गौहर जान यांचा जन्म झाला. उत्तर प्रदेशमधील आझमगडमध्ये येथे त्यांचा जन्म झाला. मात्र, त्या अवघ्या ६ वर्षांच्या असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यानंतर गौहर जान आईबरोबर बनारसला गेल्या. जिथे त्यांनी त्या काळातील काही महान संगीत आणि नृत्य उस्तादांकडून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर १८८३ मध्ये त्या कोलकाता येथे आल्या आणि त्यांनी आपलं नाव बदलून मलका जान ठेवले. गौहर जान यांनी त्यांच्याहून निम्म्या वयाच्या पठाणशी लग्न केले. पण हे नातेही फार काळ टिकले नाही. गौहर यांनी आयुष्यातील शेवटचे दिवस एकाकीपणात घालवले होते. शेवटी शेवटी तर त्यांना विस्मृती झाली. गौहर जान यांनी १७ जानेवारी १९३० रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
Indian First Famous Women Singer Gauhar Jaan Life Journey