अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशातील शिक्षण क्षेत्रात येत्या काळात अमुलाग्र बदल होणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावमी येत्या काही महिन्यातच होणार आहे. तसेच,, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील बदलांबाबत अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या बदलांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण मंत्रालयाने नुकताच एक वेबिनार आयोजित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारच्या माध्यमातून यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा शैक्षणिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम या विषयावर चर्चा करत मार्गदर्शन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा तरुण हा देशाच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे. आजच्या तरुण पिढीला सक्षम बनवणे म्हणजे भारताचे भविष्य सक्षम करणे असे आहे. २०२२च्या अर्थसंकल्पात हा विचार करून शिक्षण क्षेत्रात काही महत्त्वाच्या गोष्टींवर सरकार भर देणार आहे. त्यासाठी पाच बाबी सरकारने ठरवल्या असून, त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करून शिक्षण पद्धतीचा विस्तार करणे. शिक्षणाची गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि शिक्षणक्षेत्राची क्षमता वाढली पाहिजे. दुसरा मुद्दा कौशल्य विकासाशी संबंधित असून, भारतीय शिक्षण आणि कौशल्य विकास यातील तफावतीवर नेहमीच प्रकाश टाकला जातो. ही तफावत दूर करण्यासाठी कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. देशात डिजिटल स्किलिंग इकोसिस्टीम असावी, उद्योगाच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असावे, यावर भर दिला जाईल. तिसरा मुद्दा शहरांचे नियोजन आणि रचना हा असणार आहे. भारतातील प्राचीन काळातील अनुभव आणि ज्ञानाचा आजच्या काळात कसा उपयोग होईल, यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. चौथा मुद्दा आंतरराष्ट्रीयीकरण हा असून, जागतिक दर्जाची परदेशी विद्यापीठे भारतात आणण्यासाठी या उद्दिष्टातून प्रयत्न केला जाणार आहे. तर पाचवा मुद्दा एनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक याविषयी मांडण्यात आला. सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे एनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिकमध्ये प्रचंड रोजगार उपलब्ध आहेत. त्यामुळे बदलत्या शिक्षणपद्धतीत एनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक यांनाही महत्त्व असणार आहे.
याशिवाय, ई-विद्या, वन क्लास वन चॅनल, डिजिटल लॅब, डिजिटल युनिव्हर्सिटी, अशा शैक्षणिक पायाभूत सुविधा तरुणांसाठी उपलब्ध करुन दिल्या जातील. नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटी हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील एक अद्वितीय आणि अभूतपूर्व पाऊल ठरेल. जागतिक मातृभाषा दिनावर प्रकाश टाकत त्यांनी मातृभाषेतील शिक्षण मुलांच्या मानसिक विकासाशी निगडीत असल्याचे म्हणले. वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण अनेक राज्यांमध्ये स्थानिक भाषांमध्ये सुरू झाले आहे. त्याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होणार आहे. जागतिक महामारीच्या काळात डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळेच आपली शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू शकली.