मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. पण हा देव घडण्यामागे ज्यांना श्रेय जाते त्यात गुरू रमाकांत आचरेकर सर आणि त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर यांचं नाव आघाडीवर असतं. येत्या २४ एप्रिलला (सोमवार) सचिन ५० वर्षांचा होणार आहे. त्यानिमित्ताने त्याने एका मुलाखतीत अनेक आठवणींना उजाळा दिला.
सचिन तेंडुलकर घडण्यामागच्या असंख्य कथा आहेत. कधी त्या स्वतः सचिनने जगाला सांगितल्या आहेत तर कधी त्याच्या सहवासातील लोकांनी सांगितल्या आहेत. सचिन सोमवारी आपला ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात सचिनने संवाद साधला.
सचिन म्हणाला की, ‘पहिली मुलाखत शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर एका हॉटेलमध्ये दिली होती. मुलाखत म्हणजे काय असतं, हेही माहिती नव्हतं. ती मुलाखत दिल्यानंतर पुढे काय होणार आहे, हेही माहिती नव्हतं. मस्त चहा आणि मस्कापाव खात ही मुलाखत दिली होती. पण मोठा भाऊ अजित माझ्यासोबत होता, त्यामुळे मला कसलेच दडपण यायचे नाही.’
वयाचे अर्धशतक
आपल्या ५०व्या वाढदिवसानिमित्त बोलताना ‘हे अर्धशतक माझ्या आयुष्यातील सर्वांत संथ अर्धशतक आहे’ अशी मिश्किलीही त्याने केली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल सचिनला विचारले असता सध्या कुटुंबियांनी कमालिची गुप्तता पाळली असल्याचे सांगितले. ‘वाढदिवस कुठे होणार आहे आणि कसे सेलिब्रेशन होणार आहे, याबद्दल मला काहीच माहिती नाही. मला सोमवारपर्यंत वाट बघावी लागणार आहे,’ असे तो म्हणाला.
म्हणून निराश झालो होतो
शालेय क्रिकेट स्पर्धेत पहिलं शतक झळकावल्यानंतर सामना जिंकल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. पण मी शतक झळकावूनही माझा फोटो छापून आला नव्हता. त्यामुळे मी निराश झालो होतो. मला खूप लोकांनी चिडवलेही होते. पण त्यानंतर माझ्या प्रत्येक खेळाचे माध्यमांनी कौतुक केले आणि सतत माझा फोटो छापून येऊ लागला. मला माध्यमांनी खूप प्रोत्साहन दिलं, अशी भावना सचिनने व्यक्त केली.
Indian Cricketer Sachin Tendulkar Share Old Memories