मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने निवृत्तीनंतर फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यांमध्ये पुढाकार घेतला आहे. ज्याप्रमाणे त्याने मैदान गाजवले त्याचप्रमाणे तो आता सामाजिक क्षेत्रही गाजवतो आहे. आता त्याने मध्य प्रदेशातील एका गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यात खाटेगाव तालुक्यातील संदलपूर या गावात सचिन तेंडुलकर फाउंडेशनचे शाळा सुरू होणार आहे. आणि या शाळेला सचिनने आई-बाबांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. रजनी व रमेश तेंडुलकर यांना समर्पित ही शाळा पुढील दहा किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे २ हजार ३०० मुलांना मोफत शिक्षण देणार आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार या गावातील साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि त्यात गेल्या १२ वर्षांमध्ये काहीही बदल झाला नाही.
उलट निरक्षरता सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे सचिनने या गावात शाळा सुरू करून येथील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सचिनने अलीकडेच त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. त्यादृष्टीने त्याची ही घोषणा विशेष मानली जात आहे. सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. आता तो उपेक्षितांच्या आयुष्यातही देव म्हणून ओळखला गेला तर आश्चर्य वाटणार नाही.
मैदानात असला तरीही
सचिन तेंडुलकर सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. मुंबई इंडियन्सचा कोच व मार्गदर्शक म्हणून तो जबाबदारी सांभाळतोय. त्यामुळे सध्या तो पूर्णवेळ टीमसोबत असतो. पण तरीही आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवण्यावर त्याचे पूर्ण लक्ष आहे, हेच यातून सिद्ध होते.
Indian Cricketer Sachin Tendulkar School Opening