इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मेलबर्नमध्ये झालेल्या रोमांचक लढतीत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषकातील आपल्या कामगिरीची जोरदार विजयी सुरुवात केली आहे. मात्र पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला असला तरी काही गोष्टी अजूनही संघाच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. रविवारी झालेली भारत – पाकिस्तान मॅच रोमांचक ठरली.
अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी, हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि विराट कोहलीने केलेली तुफानी फटकेबाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. आता काही चिंता वाढवणाऱ्या बाबी समोर येत आहेत. यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार लोकेश राहुल यांना वारंवार येत असलेलं अपयश. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा जमवल्यानंतर भारतीय संघ जेव्हा या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला तेव्हा फॅन्सना दोन्ही सलामीवीरांकडून खूप अपेक्षा होती. मात्र रोहिल शर्मा आणि लोकेश राहुल पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा अपयशी ठरले. २०२१ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची फलंदाजी निराशाजनक झाली होती. २०२२ मध्येही तेच चित्र पुन्हा दिसले आणि रोहित शर्मा आणि लोकेश राहुल माघारी परतले. सलामीवीर माघारी परतल्यानंतर भारताची फलंदाजी कोलमडली आणि संघाची ४ बाद ३१ अशी अवस्था झाली.
खरं तर वर्ल्डकपपूर्वी भारताच्या या सलामी जोडीबाबत खूप चर्चा होती. मात्र पहिल्याच सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी निराशा केल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. नसीम शाहने सुरुवातीला के. एल. राहुलला त्रिफळाचित केले. त्यावेळी तो केवळ ४ धावांवर खेळत होता. त्यानंतर रोहित शर्माही हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानेही केवळ ४ धावा काढल्या होत्या.
Indian Cricket Team T20 World Cup